धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) धाराशिव जिल्हाध्यक्षपदी डॉ. प्रतापसिंह पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीचे पत्र मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणीताई खडसे व पक्षाचे कार्यालयीन सरचिटणीस रविंद्र पवार, राज्याचे सरचिटणीस बबन कनावजे, ग्रामीण युवती प्रदेशाध्यक्ष अमृता काळदाते यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून संघटनात्मक फेरबदल होणार असल्याची चर्चा होती. या संदर्भात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची भेट घेऊन जिल्हा संघटनेत बदल करण्याची मागणी केली होती. त्या बैठकीनंतर पक्षाने तात्काळ निर्णय घेत, सक्रिय आणि सर्वसमावेशक नेतृत्वासाठी ओळख असलेल्या डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) अधिक बळकट होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या नियुक्तीमुळे धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा आणि ऊर्जा मिळणार आहे, असे मत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.
“जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन संघटना मजबूत करण्याचे काम करणार आहे. महाविकास आघाडी घटक पक्षांशी समन्वय साधून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी मी 24 तास उपलब्ध राहीन.”
डॉ. प्रतापसिंह पाटील
नूतन जिल्हाध्यक्ष
.jpg)