धाराशिव,(प्रतिनिधी)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या तसेच वसतिगृह प्रवेशासाठी रीतसर अर्ज केलेल्या,परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू ठेवता यावे म्हणून भोजन भत्ता,निवास भत्ता तसेच इतर शैक्षणिक सुविधा मिळाव्यात या उद्देशाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आलेली आहे.

या योजनेअंतर्गत इयत्ता 11वी,12वी तसेच व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ मिळतो.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 26 डिसेंबर 2024 च्या शासन  निर्णयानुसार ही योजना आता तालुकास्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही लागू करण्यात आली आहे. सन 2025-26 करिता https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, सद्यस्थितीत केवळ 51अर्ज प्राप्त झाले आहेत.हे प्रमाण अत्यल्प असून,विद्यार्थ्यांमध्ये अर्ज करण्याबाबत उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे अर्ज सादर केले असूनही वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही,अशा सर्व विद्यार्थ्यांनी वरील संकेतस्थळावर अर्ज सादर करून त्याची हार्डकॉपी (ऑनलाईन अर्जाची प्रत व आवश्यक कागदपत्रे) समाज कल्याण कार्यालय,धाराशिव येथे सादर करावी. सर्व पात्र विद्यार्थ्यांनी दिनांक 30 नोव्हेंबर 2025 पूर्वी अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन श्री.सचिन कवले,सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,धाराशिव यांनी केले आहे.

 
Top