तुळजापूर (प्रतिनिधी)-  महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवातील महानवमीदिनी बुधवारी (दि. 1) दुपारी 12 वाजता होम कुंडावर धार्मिक परंपरेनुसार अजाबळी देण्यात आल्यानंतर विधीवत देवी गर्भगृहातील घटोत्थापन (घट उठवणे) करण्यात आले. यावेळी मंदीरात मोठा पोलिस  बंदोबस्त तैनात होता. यावेळी भाविकांनी मंदिरात प्रचंड गर्दी केली होती.

महानवमीदिनी पहाटे एक वाजता चरणतीर्थ होऊन धर्मदर्शनास प्रारंभ झाला. त्यानंतर सकाळी पाच वाजता देवीला पंचामृत शुद्ध स्नान, अभिषेक करण्यात आले. त्यानंतर सिंदफळ (ता. तुळजापूर) येथील गणपत गजेंद्र लांडगे यांनी दिलेला अजाबळीचा मानाचा बकरा वाजत गाजत मंदिरात आणण्यात आला.  दुपारी बारा वाजता होम कुंडावर जीवन वाघमारे यांच्या हस्ते अजाबळी देण्यात आली. याप्रसंगी महंत, भोपे पुजारी, तहसिलदार, प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक, सेवकरी, मानकरी, भाविक आदींची उपस्थिती होती. त्यानंतर मंदिर परिसरातील उपदेवतांचे घटोत्थापन करण्यात येऊन घरघरातील घट उठविण्यात आले. मानकऱ्यांचा सत्कार यानंतर मंदिर समितीच्या वतीने अजाबळी देणारे जीवन वाघमारे व अजाबळीस बकरा देणाऱ्या गणपत लांडगे यांचा भरपेहराव आहेर देवून यथोचित सन्मान केला. या महानवमीदिनी देवी दर्शनासाठी आंध्र, कर्नाटकसह राज्यभरातील लाखभर देवीभक्तांनी तीर्थक्षेत्र

तुळजापुरात हजेरी लावली होती.

 
Top