तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सव पूर्वीच्या मंचकी निद्रेस रविवार दि. 15 सप्टेंबर रात्री भाद्रपद वद्य अष्टमीस प्रारंभ झाला. देविची ही मंचकी निद्रा अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या पहाटेपर्यंत चालणार आहे. शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी तुळजाभवानी देविची मुख्य मुर्ती विश्रांतीकरिता निद्रीस्त करण्याची प्राचीन परंपरा आहे. त्यानुसार रविवारी रात्री साडेआठ वाजता हा सोहळा पार पडला.
तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेसाठीची पूर्व तयारी मंदिरात रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून सुरु झाली. प्रथम शेकडो सुवासिनींनी देविच्या गादीचा कापूस वेचुन स्वछ करण्यासाठी गर्दी केली होती. यात आराधी सुवासनी महिला देविभक्त मंडळी मोठ्या संखेने उपस्थितीत होते. प्रथम गादीच्या कापसाची हळदी-कुंकूवाने पूजा केली व नंतर आराधनींनी एकमेकांना कुंकू लावून देविची गाणी म्हणत कापूस वेचुन स्वछ केला. हे काम पुर्ण होताच मंदीर संस्थानने
या सुवासिनींची खणाने ओटी भरली. त्यानंतर मुस्लिम धर्मिय असलेल्या पिंजारी समाजातील शेख यांनी देविच्या गादीचा कापूस पिंजून दिल्यानंतर नकाते कुटुंबियांनी गाद्यामध्ये कापूस भरुन गादी मंचकी निद्रेसाठी तयार केली. त्यानंतर पलंगे कुटुंबियांनी चांदीच्या पलंगावर सुताच्या दोन ते अडीच इंच रुंदीच्या पट्ट्या तयार केल्या. त्याखाली पलंगाला घट्ट बांधून बंदीस्त केल्या, त्यानंतर त्यावर तीन गाद्या अंथरण्यात आल्या व मंचकी निद्रेसाठी शयनगृह सज्ज करण्यात आला. सायंकाळी देविजीस भाविकांचे पंचामृत अभिषेक पूजा झाल्यानंतर मुर्ती स्वच्छ करुन ती अलगद उचलत शेजघराण्यातील चांदीच्या पलंगावर
निद्रीस्त करण्यात आली. त्यानंतर देविला चंदनाचा मळवट भरण्यात आला. यावेळी देविजीस सोन्याचे नेत्र व नाकात नथ एवढेच सुवर्णालंकार घातले जातात. त्यानंतर मुर्तीवर साड्या टाकून त्यावर मखमली रझई टाकण्यात आली. यावेळी पाळीचे भोपे पुजारी, महंत, मंदीर समितीचे ट्रस्टी व धार्मिक तसेच प्रशासकीय
व्यवस्थापकासह देविचे कर्मचारी उपस्थित होते. यानंतर नैवेद्य दाखवून आरती व प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर बंद करण्यात आले. ही देविजींची मुळ मुर्ती अश्विन
शुद्ध प्रतिपदेस म्हणजे सोमवार (दि.22) रोजी पहाटे सिंहासनाधिष्ठ केली जाणार आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजता सिंह गाभाऱ्यात ईशान्य दिशेला घटस्थापना करण्यात येवून शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे.