धाराशिव (प्रतिनिधी)- येथील तेरणा अभियांत्रिकीच्या ई टी सी विभागाच्या विद्यार्थ्यांनी नुकताच शिक्षक दिन साजरा केला. विभागाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी तेरणा ट्रस्टचे माननीय विश्वस्त श्री बाळासाहेब वाघ, कॉलेजचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने तसेच सर्व विभाग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी ई टी सी विभाग प्रमुख डॉ.प्रशांत कोल्हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता आणि भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून झाली.त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी विभागातील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी त्या सर्वांचा समयोचित आणि यथोचित सत्कार केला. यावेळी मार्गदर्शनपर भाषण करताना प्राचार्य डॉ.माने यांनी या समारंभाचे आयोजन केल्याबद्दल आभार मानून विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देताना नोकरीसाठी उपलब्ध संधी विषयी माहिती दिली.त्यांनी सिम्बॉयसिस या संस्थेबरोबर झालेल्या करारा विषयी माहिती दिली.या यावेळी पुढे बोलताना डॉ. माने म्हणाले की संस्थेचे विश्वस्त आणि “मित्रा“ चे उपाध्यक्ष आमदार  राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा सिम्बॉयसिस स्किल आणि प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या वतीने उपग्रह सेंटर मधून विविध कोर्सेस ज्यामध्ये मशीन लर्निंग,विंड एनर्जी, फूड प्रोसेसिंग  सारखे अनेक कोर्सेस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून शिकविले जाणार आहेत.

तसेच या संस्थेतर्फे तेरणा कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध कोर्सेस चे आयोजन करण्यात येईल. याच बरोबर संस्थेचे एक मान्यवर माजी विद्यार्थी श्री धीरज दिवाण यांनी आणलेल्या विद्यार्थी सर्वाभिमुख उन्नतीच्या प्रस्तावा विषयी डॉ.माने यांनी माहिती दिली. यावेळी  विश्वस्त बाळासाहेब वाघ यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांचे आभार मानून शुभेच्छा व्यक्त केल्या.

या प्रसंगी सर्व विभागप्रमुखांनी समयोचित मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले. विभाग प्रमुख डॉ. प्रशांत कोल्हे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात शिक्षक दिनाचा  सर्वांग सुंदर असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील उत्तम भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. वरचेवर असेच अप्रतिम कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये आयोजन,व्यवस्थापन,संगठण,समन्वय अशा गुणांचा विकास होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमात विभागाच्या प्रा.ज्ञानेश्वर हराळकर, प्रा.नयना भोसले वाघ,प्रा.शिवाजी शिंदे,प्रा.वंदना मैन्दर्गी यांनी आपले मनोगत सुंदर शब्दात व्यक्त केले. तसेच सर्व स्टाफने गीत गायन,शेरो शायरी आणि मिमिक्री असे विविध गुण दर्शन करून कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमासाठी ई टी सी विभागातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभाग प्रमुख डॉ.प्रशांत कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.वर्षा बोंदर यांनी व विभागाच्या द्वितीय आणि तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली आणि खूप कमी वेळात एक उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित केला.याबद्दल या विद्यार्थ्यांचे प्राचार्य,सर्व विभागप्रमुख आणि सर्व स्टाफ यांनी कौतुक केले आहे.


 
Top