धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाडा सेवक संघ,पुणे यांच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त देण्यात येणारे राज्यस्तरीय मराठवाडा रत्न पुरस्कार जाहीर झाले असून यात धाराशिव येथील दूरदर्शन आकाशवाणीचे जिल्हा प्रतिनिधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य,जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष देविदास पाठक यांना मराठवाडा रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.या पुरस्कारांचे वितरण मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पुणे येथे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड या ठिकाणी बुधवार, दि. 17 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता येथे आयोजित करण्यात आला आहे.
मराठवाडा रत्न पुरस्काराने पद्मश्री रमण गंगाखेडकर, डॉ. दिनकरराव मोरे, राजेंद्र डहाळे, हभप. नारायण महाराज पालमकर, सुभाष देशपांडे, पत्रकार देविदास पाठक, धनंजय जोशी, महादेव जगताप, रामचंद्र पवार, प्रसाद पाटील आणि गणेश खरात यांचा गौरव केला जाणार आहे. अशी माहिती मराठवाडा सेवक संघाचे संस्थापक अध्यक्ष दिनकर चौधरी आणि कार्याध्यक्ष दिनेश सास्तुरकर यांनी दिली आहे.
पुरस्काराचे वितरण नाथ संस्थानचे (औसा, जि. लातूर) पिठाधीश हभप. गुरूबाबा औसेकर महाराज यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा विभागाचे माजी सचिव व्यंकटराव गायकवाड असणार आहेत. तर पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त भक्ति-नाट्यरंग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सूरमणी धनंजय जोशी हा कार्यक्रम सादर करणार आहेत. मिहिर जोशी (संवादिनी), भार्गव देशमुख (तबला) साथसंगत करणार आहेत.