मुरूम (प्रतिनिधी) : येथील रोटरी क्लब मुरूम सिटीचे सचिव तथा कविवर्य कलाप्पा पाटील यांच्या ६० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुंदरवाडी, ता. उमरगा येथील अंगणवाडीतील बालकांना हनुमान मंदिर सभा मंडपात शालेय साहित्य व खाऊचे वाटप शनिवारी (ता.२०) रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. वाढदिवस अभिष्टचिंतन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच हर्षवर्धन जाधव होते. यावेळी रोटरीचे अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, सचिव कलाप्पा पाटील, रोटरीचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, डॉ. नितीन डागा, प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, युसुफ मुल्ला, शत्रुघन जगदाळे, महादेव कुडकले आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ग्रामपंचायत, सुंदरवाडी, रोटरी क्लब, मुरूम व अंगणवाडी सेविका यांच्याकडून वाढदिवसानिमित्ताने पाटील सरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, सध्या समाजातील तरुण मंडळी वाढदिवसावर अनाठाई खर्च करतात. या खर्चाला फाटा देऊन प्रत्येक युवकांनी आपला वाढदिवस समाज उपयोगी कार्य करून साजरा करावा, असे आव्हान त्यांनी यावेळी केले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी जाधव यांनी आमच्या गावातील अंगणवाडी बालकांमध्ये आपला वाढदिवस साजरा केल्याने निश्चितच गावकऱ्यांना प्रेरणा मिळाली. आपण दिलेल्या शालेय साहित्यामुळे ही बालके आपला आदर्श निश्चित जोपासतील. यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. महेश मोटे यांनी रोटरीही जागतिक समाजसेवी संस्था असून ती सतत समाजासाठी काम करते. सत्काराला उत्तर देताना कलाप्पा पाटील म्हणाले की, माझ्या वाढदिवसानिमित्ताने मी अंगणवाडीतील बालकांना काहीतरी दिले पाहिजे या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरियन राजकुमार वाकडे, उपप्राचार्य कल्लाय्या स्वामी, प्रकाश रोडगे, मल्लिकार्जुन बदोले, प्रजावती हळळे, बेबीसरोजा सुरवसे, वंदना कोकणे, संगीता जाधव आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नितीन डागा यांनी केले. सूत्रसंचालन सहशिक्षक संतोष कांबळे तर आभार प्रा. भूषण पाताळे यांनी मानले. यावेळी बहुसंख्येने पालक, अंगणवाडी सेविका, बालक-बालिका उपस्थित होत्या.