धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव प्रशालेत भारताचे माजी राष्ट्रपती व तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसानिमित्त शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थितांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळेचे मुख्याध्यापक पंडित जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, आईनंतर शिक्षक हा खरा गुरु असून, त्यांच्या मार्गदर्शनातूनच आपले व्यक्तिमत्व घडत असते. शिक्षण, समाजकारण आणि राजकारण या सर्वच क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करून डॉ. राधाकृष्णन यांनी विद्यार्थ्यांना व समाजाला शिस्त लावण्याचे कार्य केले. त्यांची क्षमाशील वृत्ती आणि विचारसरणी आजही प्रेरणादायी आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदकुमार रणदिवे होते. त्यांनी आपल्या भाषणात डॉ. राधाकृष्णन यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, भारताचे दुसरे राष्ट्रपती असूनही त्यांनी आपली ओळख शिक्षक म्हणूनच जपली. त्यामुळेच त्यांच्या जन्मदिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. हा दिवस विद्यार्थ्यांच्या प्रेमाचा आणि शिक्षकांच्या कृतज्ञतेचा प्रतीक आहे.
यावेळी जयश्री भोसले, चंद्रकांत माळी, सुवर्णा सोनवणे, दिपाली रोकडे, गौरी माने यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन. चंद्रकांत माळी यांनी तर आभार प्रदर्शन दिपाली रोकडे यांनी केले.