धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील शारदीय नवरात्र महोत्सवाची पुर्ण तयारी झाली असून, 22 सप्टेंबर रोजी तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना होवून नवरात्र महोत्सवास प्रारंभ होणार आहे. अशी माहिती तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रविवार दि. 21 सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस पोलिस अधीक्षक रितू खोखर, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव उपस्थित होते. जिल्हाधिकारी पुजार यांनी सांगितले की, 22 ते 30 सप्टेंबरपर्यंत नवरात्र महोत्सवानिमित्त सोमवार 22 सप्टेंबर रोहित राऊत (इंडियन आयडॉल फेम) भक्तिसंगीत व ऑर्केस्ट्रा, मंगळवार 23 सप्टेंबर पं. जयतीर्थ मेवुंडी विशेष दर्शन व शास्त्रीय संगीत संध्या, बुधवार 24 सप्टेंबर अभिजीत जाधव लोकसंगीत मैफील, गुरुवार 25 सप्टेंबर फोक लोक स्टुडिओ लोकसंगीत मैफील, शुक्रवार 26 सप्टेंबर शाहीर रामानंद उगले लोकगीते मैफील, शनिवार 27 सप्टेंबर रसिकपर्ण डान्स अकॅडमी लोकनृत्य सादरीकरण, रविवार 28 सप्टेंबर राणा जोगदंड लोकसंगीत मैफील, सोमवार 29 सप्टेंबर ड्रोन् शो 300 ड्रोनद्वारे नवरात्र थीमवरील भव्य लाईट शो, मंगळवार 30 सप्टेंबर फोकआख्यान, भव्य लोकसंगीत मैफील असे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. भक्तांच्या सुविधांसाठी विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. यंदा प्रथमच एआयआय 10 सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. दर्शन पास दरवाढी बाबत बोलताना जिल्हाधिकारी यांनी व्हीआयपी व व्हीव्हीआयपी यांच्या दर्शन पासमध्ये दरवाढ करण्यात आली आहे. सर्वसामान्य भक्तांना रांगेत मोफत दर्शन सोय उपलब्ध आहे.
पोलिस बंदोबस्त
पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी सांगितले की, तुळजापूर येथे होणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला असून, पोलिसांच्या राहण्याची व जेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पेशल 10 टिमची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याप्रमाणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी 300 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. या महोत्सवादरम्यान 2 एसपी, 12 डीवायएसपी, 100 पीएसआय, पोलिस अंमलदार, पोलिस असे एकूण 2 हजार 500 लोकांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.