धाराशिव (प्रतिनिधी)- छतावरील सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वीजग्राहकांनी लाभ घेवून विजेच्या संदर्भात स्वयंपुर्ण व्हावे या उद्देशाने महावितरणच्या वतीने 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्त जिल्हयातील विविध ग्रामपंचायती मध्ये योजनेची माहिती देवून जनजागृती करण्यात आली.
प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेला शहरी भागात मोठा प्रतिसाद मिळत असून राज्यातील अडीच लाख वीजग्राहकांनी आपल्या घराच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती सुरू केली आहे. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील वीजग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा या हेतूने सांघिक कार्यालयाच्या निर्देशानुसार स्वातंत्र दिनी जिल्ह्यातील ग्रामपंचायती मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रधानमंत्री सुर्यघर योजनेची जनजागृती करण्यात आली. महावितरणच्या सर्व शाखा कार्यालय, उपविभागीय कार्यालयातील अभियंते, जनमित्र या जनजागृती मोहीमेत सहभागी झाले होते. योजनेची माहिती असलेले पॉम्पलेटचे वाटपही या मोहीमेत करण्यात आले.
या योजनेमध्ये छतावरील सौरऊर्जा पॅनलद्वारे विजनिर्मिती वापरापेक्षा जास्त झाल्यास वीजबिल शून्य होईल व ग्राहकाला वीजबिल भरायचे काम पडणार नाही. तसेच वीज ग्राहकांना यामध्ये अनुदानही दिले जात आहे. यामध्ये 1 किलो वॅटपर्यंत 30 हजार व 2 किलो वॅटपर्यंत 60 हजार, 3 किलो वॅटपर्यंत 78 हजार रूपये अशी सबसिडी ग्राहकाला मिळणार आहे. सौर ऊर्जेद्वारे दरमहा 1 किलो वॅट 120 युनिट, 2 किलो वॅट 240 युनिट, 3 किलो वॅट 360 युनिट वीज निर्मीती केली जाते. सोलर पॅनल हे पंचवीस वर्षापर्यंत वीजनिर्मीती करतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विविध बँकाकडून वीजग्राहकांना कर्ज उपलब्ध केले जात आहे. वीजग्राहकाच्या आवश्यकतेपेक्षा जास्त वीज निर्मिती झाल्यास उर्वरीत युनीट महावितरणला देवून डिपॉझीट केले जातात. परिणामी आपला वीजवापर जास्त झालेल्या काळात त्याचा फायदा होतो. अशी माहिती महावितरणच्या अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून ग्रामस्थांना देण्यात आली. याप्रसंगी सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायतचे सदस्य यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रधानमंत्री सुर्यघर योजनेचा लाभ घेण्याची ग्वाही दिली.