धाराशिव (प्रतिनिधी)- हल्ली महिला व मुलींवर अत्याचार करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यावर कारवाई देखील होते. मात्र यावर पळवाट काढित वाशी तालुक्यातील पारगाव टोल नाक्याजवळील तुळजाई कला केंद्रामध्ये चक्क 14 ते 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलींचा सर्रास वापर करून त्यांच्यावर रात्रंदिवस लैंगिक अत्याचार केला जात आहे. त्यामुळे त्या मुलींची सुटका करण्यासह ते कला केंद्र तात्काळ बंद करण्यात यावे. अन्यथा दि.25 ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) युवक आघाडीच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे दि.20 ऑगस्ट रोजी दिला आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील बीड व धाराशिव जिल्ह्याच्या बॉर्डरवर मात्र धाराशिव जिल्ह्याच्या हद्दीत पारगाव टोलनाक्याजवळील तुळजाई कला केंद्र आहे. या केंद्रात 14 ते 16 वर्षे वयोगटातील अल्पवयीन मुली असून त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात येत आहे. तसेच त्या कला केंद्रावर बीड जिल्ह्यातून बरेच युवक वाम मार्गाला लावण्याचे काम केले जात आहे. त्या कला केंद्रामध्ये वर्चस्वावरून सतत भांडणे होत असून ती भांडणे आवाक्याच्या बाहेर जातात. त्या भांडणामध्ये धारदार शस्त्रे, बंदूक व इतर हत्यारांचा सर्रास वापर केला जात असून ही अत्यंत गंभीर बाब आहे. विशेष म्हणजे या कला केंद्राचे मालक व संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलिसांची मिलीभगत आहे. तसेच या केंद्रावर डान्स पार्टी, मद्य विक्री असले कार्यक्रम चालत असल्यामुळे स्थानिक महिला व शालेय विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम होत आहे. त्या केंद्रावर दररोज कोणल्याही कारणावरून गोळीबार, धारदार शस्त्र चालवणे असे प्रकार घडत आहेत. तर बीडमधील काही युवकांना या कला केंद्रावर बेदम मारहाण करण्यात आली. तसेच अनेकजणांचा या कलाकेंद्रामुळे अपघातात मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे त्या मुलींची तात्काळ सुटका करण्यासह ते कला केंद्र बंद करण्यात यावे. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. यावर रिपाइंचे बीड जिल्हाध्यक्ष महेश आठवले, ॲड धम्मानंद वाघमारे, भूषण कांडेकर, राहुल कोकाटे, संतोष दळवी, अनिकेत कांबळे, अनिकेत आरुण, विशाल शिरसाट, अमोल राठोड, वैष्णव बेंद्रे व जयदीप काशीद यांच्या सह्या आहेत.

 
Top