भुम (प्रतिनिधी)- अवघ्या काही दिवसात जिल्ह्यातील मोठा असलेला सिना कोळेगाव प्रकल्प शंभर टक्के भरणार आहे. त्यामुळे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी अनाळा साठवण तलावात सोडण्यात यावे. अशी मागणी माजी आमदार राहूल मोटे यांनी सीना - कोळेगाव प्रकल्पाच्या कार्यकारी अधिकारी यांचेकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिना कोळेगाव प्रकल्प लवकरच शंभर टक्के भरेल. त्यावेळी अतिरिक्त पाणी खाली वाहून जाईल ते वाहून जाणारे पाणी अनाळा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अनाळा साठवण तलावात सोडणे गरजेचे आहे. कारण अनाळा साठवण तलाव अजून शंभर टक्के भरलेला नाही. त्यामुळे परिसरातील शेतक-यांच्या शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी अनाळा साठवण तलावात पाणी सोडावे. अशी मागणी शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात होत आहे. तरी आपण पाणी सोडण्यासाठी तात्काळ योग्य ती उपाययोजना करून शंभर टक्के सिनाकोळेगाव धरण भरल्यावर अतिरिक्त वाहून जाणारे पाणी अनाळा साठवण तलावात सोडण्यात यावे. जर अतिरिक्त पाणी खाली वाहून गेले व अनाळा साठवण तलाव कोरडा राहिला तर याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहिल असे राहुल मोटे यांनी निवेदनात म्हटले आहे.