नळदुर्ग (प्रतिनिधी)- येथील बोरी धरण पूर्ण क्षमतेने भरून धरणाचा सांडवा वाहण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवार दि. 14 ऑगस्ट 2025 रोजी पहाटेच्या वेळी धरणाचा सांडवा वाहण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी वाहणारा सांडवा व धरणातील जल पूजन करण्यात आले. पुढील वर्षीचा तुळजापूर, नळदुर्ग, अणदूर या मोठ्या शहरासह ग्रामीण भागातील बहुतांशी गावचा पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
यावर्षी मे महिन्यात झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत भरीव अशी वाढ झाली होती, त्यामुळे जून महिन्यात धरण्याच्या पाणलोट क्षेत्रातील सलगरा दिवटी, होर्टी येथील साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे या दोन्ही साठवण तलावातून येणाऱ्या पाण्यामुळे जून मध्येच बोरी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र पुन्हा पावसाने मोठी उघडीप दिल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाणी कमी येत असल्याने धरण भरणे लांबले होते. मात्र गेल्या आठ दहा दिवसापासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत चांगली वाढ होत राहिल्याने अखेर 14 ऑगस्ट 2025 रोजीच्या पहाटे बोरी धरण पूर्ण क्षमतेने भरून धरणाचा सांडवा वाहण्यास सुरुवात झाली आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील चिकुंद्रा, मानेवाडी, हगलुर, मूरटा या गावातील शेतकऱ्यांसह लाभ क्षेत्रातील येडोळा, निलेगाव, अणदूर, खुदावाडी, वागदरी, गुजनूर, शहापूर, दहिटना, गुळहल्ली यासह दहा गावातील सुमारे साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांना पुढील वर्षी रब्बी हंगामास, ऊस पिकाला पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांतून ही समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने आणि धरणाचा सांडवा वाहत असल्याने नळदुर्गचे प्रतिष्ठित नागरिक माजी नगरसेवक विनायक अहंकारी, सुधीर हजारे, पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, ज्येष्ठ पत्रकार विलास येडगे, विकास सोसायटीचे संचालक रघुनाथ नागणे, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, पत्रकार उत्तम बनजगोळे यांनी धरणातील व वाहणाऱ्या सांडव्याचे जल पूजन केले. धरणाचा सांडवा वाहत असल्याने बोरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून येथील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यातील नर मादी धबधबा ही सुरू झाला आहे. त्यामुळे किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.