धाराशिव (प्रतिनिधी)- समाजात प्रेरणा देणारा क्षण आज विशेष दत्तक संस्था, धाराशिव येथे पाहायला मिळाला. डॉ. दयानंद चौरे आणि डॉ. प्रियंका चौरे (नवोदय हॉस्पिटल, धाराशिव) यांनी आपल्या लग्नाच्या 12 व्या वाढदिवसानिमित्त संस्थेला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी संस्थेतील निरागस अनाथ बालकांसोबत वेळ घालवला, त्यांच्याशी संवाद साधला आणि संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती घेतली.
विशेष म्हणजे, त्यांनी संस्थेला आर्थिक मदत देखील केली, जी मुलांच्या संगोपनासाठी उपयुक्त ठरणार आहे.बालकांची निरागसता आणि आत्मीयता अनुभवताना, त्यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव व्यक्त केली आणि सांगितले की, “अशा बालकांसाठी समाजाने पुढे येणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.“
विशेष दत्तक संस्था ही जिल्हा महिला व बाल विकास विभाग आणि जिल्हा बाल कल्याण समिती यांच्या देखरेखीखाली, (केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण) च्या मान्यताप्राप्त मार्गदर्शक तत्त्वांनुसार कार्यरत असून, आतापर्यंत संस्थेतील 2 अनाथ बालकांना दत्तक प्रक्रियेद्वारे हक्काचे पालक मिळवून देण्यात आले आहे.
या संस्थेच्या कार्यास सातत्याने डॉ. दिग्गज दापके-देशमुख यांचे मार्गदर्शन लाभते. तसेच अंजुमन हेल्थ केअरचे संस्थापक फेरोज पल्ला आणि अधिक्षक ईश्वर राठोड यांचेही योगदान मोलाचे आहे. संस्थेच्या वतीने चौरे दांपत्याचे मनापासून आभार मानले गेले असून, त्यांच्या या कृतीमुळे समाजात एक सकारात्मक आणि संवेदनशील संदेश पोहोचला आहे.