धाराशिव (प्रतिनिधी)- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) सन 2021-22, 2022-23 व 2023-24 या आर्थिक वर्षांतील वैयक्तीक कुशल कामांची थकित देयके वितरीत करण्यास शासन स्तरावरून मंजुरी प्राप्त झाली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) थकीत बिलांच्या संदर्भात खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आयुकत, म.ग्रा.रो.ह.यो नागपूर यांना दि. 27/06/2025 रोजी आयुक्त, मग्रारोहयो यांना संदर्भात पत्र व्यवहार केला होता. त्या अनुषंगाने सदर योजनेतील विहीरी, गायगोठे, फळबाग लागवड, तुती लागवड, शौचालय आदी वैयक्तीक कुशल कामाच्या बिलापोटी 7 कोटी 20 लक्ष व सार्वजनिक कुशल कामाच्या बिलापोटी 86 लक्ष रुपये निधीचे वितरण सुरु झाले आहे.
आयुक्तालय स्तरावरून प्राप्त निर्देशानुसार, ज्या कामांची योग्य पडताळणी व नियमबद्ध प्रक्रियेनंतर खातरजमा झाली आहे, अशा कामांसाठी संबंधित यंत्रणांना देयक अदा करण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतील मंजूर देयकांची यादी कार्यालयीन वेळेत निधी आहरणासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सन 2021-22, 2022-23 व 2023-24 या आर्थीक वर्षातील थकीत देयके देण्याबाबत संबंधीत यंत्रनेला निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सन 2023-24 या वर्षातील प्रलंबीत देयके देण्याच्या वितरणास मान्यता दिली असल्याचे पत्राव्दारे कळविण्यात आले आहे. मागील 4 वर्षापासून शेतकऱ्यांनी सदर योजनेतून केलेल्या कुशल कामाची बिले मिळणार आहेत.