धाराशिव (प्रतिनिधी)- महास्ट्राईड‌‘ या प्रकल्पाचा उद्देश हा प्रत्येक जिल्ह्याच्या स्थानिक गरजा आणि बलस्थान लक्षात घेऊन विशेष विकास आराखडे तयार करणे आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे, असा आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यांच्या विकासाला दिशा मिळेल आणि महाराष्ट्राच्या एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीत प्रत्येक जिल्ह्याचा सक्रिय सहभाग सुनिश्चित होईल. महास्ट्राइड प्रकल्पाच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती देणाऱ्या 31 प्रकल्पांवर भर देण्याचे ठरले आहे अशी माहिती मित्र उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगतजितसिंह पाटील यांनी दिली. 

'मित्र' संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार आणि जागतिक बँकेच्या सहकार्याने महास्ट्राईड‌‘ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या अंतर्गत धाराशिव जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणाऱ्या महत्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी नुकतीच एक महत्त्वाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीत जिल्ह्याचे संख्यात्मक नियोजनाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न हे रू.1,90,383 असून सकल राज्यांतर्गत उत्पन्नात जिल्ह्याचा वाटा 1% आहे. 2027 पर्यंत तो तेव्हाच्या उत्पन्नाच्या 1.2% करण्याचे उद्दीष्ट असुन देशाच्या व राज्याच्या विकासासोबतच जिल्हा देखील मागे रहायला नको यासाठी प्रभावीपणे काम सुरू करणे आवश्यक आहे.

 
Top