उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर दाबका गावाजवळ एका बलेनो कारला अचानक आग लागल्याने एका व्यक्तीचा जळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या गाडीतून प्रवास करणारे अन्य दोघे जण सुखरूप बचावले आहेत. ही घटना शिर्डीहून दर्शन घेऊन हैदराबादला परत जाताना घडली. मयत व्यक्ती हैदराबाद येथील शिक्षक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच उमरगा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलेनो कारने अचानक पेट घेतला. गाडीतील तिघांपैकी एका व्यक्तीला बाहेर पडता न आल्याने त्यांचा गाडीतच होरपळून मृत्यू झाला. तर, अन्य दोघे जण वेळीच गाडीबाहेर पडल्याने त्यांचे प्राण वाचले.
घातपाताचा संशय बळावलाया घटनेत एक जण मयत झाला असून दोघे जण सुखरूप बचावल्याने पोलिसांना घातपाताचा संशय आला आहे. घटनेतून वाचलेल्या व्यक्तींकडे चौकशी केली असता, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला आहे. “आम्ही या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहोत. बचावलेल्या दोघांची कसून चौकशी केली जात आहे. त्यांच्या उत्तरांमध्ये विसंगती आढळल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल,“ असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. मृतदेह शवविच्छेदनासाठी उमरगा येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून, त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलीस आणि न्यायवैद्यक पथक अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.