तुळजापूर (प्रतिनिधी)- कर्नाटक राज्यातील बेंगळुरू येथील माजी आमदार निर्मलकुमार सुराणा यांचे पुत्र आदित्य सुराणा आणि त्यांच्या पत्नी प्रतिक्षा सुराणा यांनी आज श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला दोन ई-रिक्षा भेट दिल्या. तसेच मंदिर संस्थानला अकरा हजार रुपयांची देणगी देखील अर्पण केली.
आदित्य सुराणा हे बेंगळुरूमधील नामवंत उद्योगपती असून, प्रज्ञा ऑटोमोबाइल्स या कंपनीचे ते व्यवस्थापकीय संचालक आहेत. सुराणा दांपत्याने आपल्या कुटुंबीयांसह आज तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले आणि भक्तांच्या सेवेसाठी दोन ई-रिक्षा मंदिर संस्थानला अर्पण केल्या.
ई-रिक्षांचे लोकार्पण आदित्य सुराणा व त्यांच्या पत्नी प्रतिक्षा सुराणा यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार, मंदिर संस्थानचे विश्वस्त तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या ई-रिक्षा मंदिरात येणाऱ्या वयोवृद्ध आणि दिव्यांग भक्तांसाठी उपयुक्त ठरणार असून त्यांना मंदिर परिसरात येण्या-जाण्यास सहज सुलभ होणार आहे. मंदिर संस्थानच्यावतीने सुराणा दांपत्यांना श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा आणि महावस्त्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) अरविंद बोळंगे, लेखाधिकारी रामदास जगताप, नितीन काळे, आनंद कंदले, प्रवीण अमृतराव, सचिन जाधव, गणेश मोटे, महेंद्र आदमाने, सुहास साळुंके, परिक्षीत साळुंके, ऋषभ रेहपांडे, आसिफ डांगे, शशिकांत शिंदे तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.