धाराशिव (प्रतिनिधी)- 1 मे 2025 रोजी खरीप हंगाम 2025-26 साठी पूर्वतयारी आढावा बैठक पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली.या बैठकीत बँकनिहाय खरीप पिककर्ज वाटपाचे नियोजन सादर करण्यात आले.
सर्व बँकांनी 30 जून 2025 पर्यंत दिलेल्या लक्षांकाचे 100% कर्जवाटप पूर्ण करावे,असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.तसेच मागील हंगामात घेतलेल्या पिककर्जाची तात्काळ वसूली करून जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने मंजूर केलेल्या दरानुसारच प्राधान्याने कर्ज वाटप करावे,असेही ठरवण्यात आले.
शासनाने खरीप हंगाम 2025-26 साठी खालीलप्रमाणे प्रति हेक्टरी कर्जदर निश्चित केले आहेत.ते पुढीलप्रमाणे आहेत.सोयाबीन: 75 हजार रुपये,तुर 48 हजार 400 रुपये,ऊस 1 लक्ष 70 हजार रुपये, उडीद/मुग 29 हजार रुपये असे निश्चित केले आहे. सर्व बँकांनी या वाढीव दरांनुसार पीककर्ज वितरित करावे व एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी.ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2024-25 मध्ये पीककर्ज घेतले आहे,त्यांनी तत्काळ आपल्या बँकेत जाऊन कर्जाची वसूली भरावी आणि वाढीव कर्जाचा लाभ घ्यावा. कर्जवाटपासंदर्भात अडचण आल्यास संबंधित बँकेचे मुख्य कार्यालय, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक किंवा तालुक्याचे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था, धाराशिव यांनी केले आहे.