उमरगा (प्रतिनिधी)-  शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनी वारंवार फुटत असल्याने त्याची दुरुस्ती करण्यात नगरपालिका प्रशासन कायम व्यस्त आहे. शहरातील अनेक भागात तब्बल पंधरा दिवसाला पाणीपुरवठा होत आहे. शहरावर मोठे जलसंकट उभे राहिले असून लोकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. यातच नविन समांतर पाणीपुरवठा कामासाठी शहरातील रस्ते फोडून टाकले आहेत. निधी अभावी तेही काम रेंगाळल्याचे दिसुन येत आहे. सर्वच राजकीय पक्षांची कमजोर भूमिका बघता शहरवासीयांना वाली उरलेला नाही.

उमरगा शहरासाठी कायमस्वरूपी  पाणीपुरवठा करण्यासाठी निम्न तेरणा धरणातून पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. 2001 साली मंजूर करण्यात आलेली ही योजना 2013 साली पूर्ण करण्यात आली. 1999 साली सुरुवातीला 4 कोटीचे अंदाजपत्रक असलेली योजना पूर्ण होईपर्यंत 2013 पर्यंत 23 कोटीची झाली. सदरील योजना पूर्ण झाल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी आशा होती. पण वेळोवेळी पाईपलाईन फुटीमुळे शहरवासीयांच्या आशेवर पाणी फेरले आहे. शेवटच्या टप्प्यात काम झालेली समुद्राळ ते उमरगा पाइपलाइन फुटण्याची डोकेदुखी वारंवार सतावत आहे. पाइपलाइन फुटीमुळे हजारो लिटर पाणी वाया जाणे, दुरुस्तीसाठी पैसे, वेळ व प्रशासनाचे श्रम वाया जात आहेत. आठ-पंधरा दिवसाला पाइपलाइन फुटणे, विदयुत पंप जळणे, विजेचा लपंडाव, ढिसाळ नियोजनामुळे शहरातील अनेक भागात 15 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. 


निकृष्ट दर्जाचे पाईप

शहराला करण्यात आलेली पाणीपुरवठा योजना ही “असुन घोटाळा अन्‌‍ नसुन खोळंबा“ अशी अवस्था झाली आहे. पाईपलाईनसाठी अतिशय निकृष्ट दर्जाचा पाईप वापरण्यात आल्याने सतत पाईपलाइन फुटीचे ग्रहण लागले आहे. हे लिकिजेस काढण्यासाठी प्रतिवर्षी 12 ते 15 लाख रुपये खर्च होत आहे. माकणी धरणात धरणात मुबलक पाणी असून उमरगा शहराला पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या योजनेची जलवाहिनी बलसुर मोड पासून महामार्गालगत टाकण्यात आली आहे. जलवाहिनी वारंवार फुटत आहे. मुळातच जी आर पी पाईप असून अत्यंत निकृष्ट दर्जाचे हे पाईप असल्याने थोड्याशा दाबाने ही फुटतात व लाखो लिटर पाणी वाया जात आहे. 


खाजगी टँकरवाल्यांची मनमानी 

पाणीपातळी खोलवर गेल्याने शहरातील सरकारी व खाजगी बोअरवेल बंद पडले आहेत. यातच 15 दिवसांपासून पाणीपुरवठा नसल्याने नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. खाजगी टँकरवाले मनमानी पद्धतीने दर आकारत असुनही नाईलाजाने म्हणेल त्या किमतीवर पाणी विकत घ्यावे लागत आहे.

 
Top