धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील पुजारी व ड्रग्ज असा कोणताही संबंध नाही, सर्व पुजाऱ्यांना बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे. ड्रग्ज बाबत गेल्या 3 वर्षांपासुन पुजारी व पुजारी मंडळ बैठका घेऊन आंदोलन, निवेदन व विविध माध्यमातून आवाज उठवत आहे अशी प्रतिक्रिया पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे परमेश्वर कदम, पक्षाळ पुजारी मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी व सामाजिक कार्यकर्ते नागनाथ भांजी यांसह इतरांनी दिली आहे.
ड्रग्ज तस्करी प्रकरण पुजाऱ्यांनी बाहेर काढले आहे. यात पोलिसांची भुमिका अजूनही संशयास्पद आहे. ड्रग्ज तस्करासोबत ज्याचे आर्थिक व्यवहार झाले आहेत त्यांना यात जवळचा लांबचा न पाहता कारवाई झाली पाहिजे. असे भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी सांगत इशारा दिला. देऊळ ए कवायत हा नियम मंदिरातील कामासाठी आहे. तो बाहेर लागु नाही. त्यामुळे तसे आम्ही होऊ देणार नाही असेही ते म्हणाले.
ड्रग्ज पासुन तुळजापूर वाचवा हा देखावा मंडळाने केला होता. त्यावेळी जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन व प्रसार माध्यम गप्प का होती असा सवाल त्यांनी केला. एका पुजाऱ्याने ड्रग्जचा विषय बैठकीत तत्कालीन पोलिस अधीक्षक यांच्यासमोर जाहीर मांडला. काही गोपनीय नावे दिली, पुजाऱ्यांनी लेखी पत्रव्यवहार केला. तेव्हा का कारवाई केली नाही. असे मत पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे यांनी व्यक्त केले. ड्रग्जबाबत सुरुवातीला पुजाऱ्यांनी आवाज उठवला, त्यात कोण अडकले आहे, जात, धर्म, राजकीय पक्ष याचा विचार न करता पाठपुरावा केला. तुळजापूर येथील चुकीच्या बाबीला आळा बसावा म्हणुन कायम पुढाकार घेतला आहे. असे नागनाथ भांजी यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी मी एक महिन्यापूर्वी आलो आहे. ड्रग्ज प्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई होईल. या संदर्भात पोलिस अधीक्षक यांच्याकडून माहिती घेत आहे. असे पुजार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तर पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी ड्रग्ज प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही. तपास निप्पक्ष व कठोर आणि कायद्याच्या चौकटीत होत आहे. आरोपी कोण आहे त्यापेक्षा त्याची गुन्ह्यातील भूमिका काय आहे. हे महत्वाचे आहे. आम्ही कोणावरही सरसकट आरोप करत नाही. पण पुराव्याच्या अधारे कठोर कारवाई करणार असे पोलिस अधीक्षक जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.