उमरगा (प्रतिनिधी)- शहरात मंगळवारी (15) दुपारी चारच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर फिल्मी स्टाइलने एका कारमधून आलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी दुचाकीवरून घराकडे जात असलेल्या बांधकाम गुत्तेदाराच्या डोक्यात आणि हातावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली. पोलीस तपासात गुन्हेगारांनी वापरलेली कार कर्नाटक सीमा भागातील खजुरी येथे सापडलेली असून आरोपीच्या शोधासाठी चार पथके तैनात केल्याचे उपविभागीय अधिकारी सदाशिव शेलार यांनी सांगितले. दरम्यान 24 तासात पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून चौथा ही लवकरच सापडले अशी माहिती पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी दिली.
गुप्त माहिती वरून व पोलीस सोर्सकडून आरोपींची कार मंगळवारी रात्री कर्नाटक सीमेवर खजुरी (ता. आळंद) गावानजीक सापडली. तर आरोपी हे कर्नाटक मधील बसवकल्याण येथील एका हॉटेलमधून राहुल रमाकांत परशेट्टी (23, रा. काळे प्लॉट उमरगा), शिवा कुकुर्डे (21, रा. कुन्हाळी), प्रदीप कलशेट्टी (27, रा. जुनी पेठ उमरगा) अशी संशयित आरोपीची नावे असून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. जीवघेणा हल्ला करण्याचे कारण विचारले असता गोविंद दंडगुले व राहुल परशेट्टी यांच्यात प्लॉट वरून वाद झाले होते. याचा राग मनात धरून हा हल्ला केल्याचे आरोपींनी सांगितल्याचे पोनि श्रीमती भोसले यांनी सांगितले. एक आरोपी निष्पन्न व्हायचा आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, सहा. पोलीस निरीक्षक पांडुरंग कन्हेरे, पोलीस उपनिरीक्षक गजानन पुज्जरवाड,पोलीस कर्मचारी प्रदीप ओव्हळ, चैतन्य कोनगुलवार, यासिन सय्यद, अनिरुद्ध कावळे, नवनाथ भोरे, विशाल कांबळे यांच्या पथकाने कारवाई केली. दरम्यान या प्रकरणी बुधवारी (16) अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांनी घटनास्थळी भेट दिली.