धाराशिव (प्रतिनिधी)- बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या वतीने सर्व सामाज समावेशक महामानव, बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. 27) धाराशिव येथे भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रि जन्मशताब्दी वर्षानिमित्त देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बहुजन योद्धा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा जयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक धनंजय शिंगाडे यांनी दिली. 

धाराशिव शहरातील मेघमल्हार हॉलमध्ये शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद घुले, माजी अध्यक्ष ॲड. परवेज अहमद, कोषाध्यक्ष विशाल शिंगाडे, मार्गदर्शन समिती सदस्य खलील सय्यद, चौरे, राजेंद्र अत्रे, इलियास पीरजादे, प्रसेंजीत शिंगाडे, सरिपुत शिंगाडे, रवि कोरे आळणीकर, इंद्रजित देवकते यांची प्रमुख उपस्थिती होती. 

जयंती उत्सव समितीच्या वतीने यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 11 जणांचा समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी विधानसभेचे सभापती राम शिंदे यांना निमंत्रित करण्यात आले असून त्यांनी जयंती सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छ्त्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मूर्तीचे पूजन करून या मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. यामध्ये 120 लोकांचे गजाढोल पथक, तसेच केरळ राज्य, कोल्हापूर, सांगली व इतर जिल्ह्यातील पारंपरिक वाद्य पथक सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.  प्रास्ताविकात जयंती समितीचे अध्यक्ष मुकुंद घुले यांनी केले. तर जयंती समितीचे माजी अध्यक्ष ॲड. परवेज अहमद, खलील सय्यद, ॲड चौरे  इंद्रजित देवकते यांचे भाषण झाले.

दुपारी 3 ते 6 या वेळेत मिरवणूक उद्घाटन स्थळी कार्यक्रम होणार असून त्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ होईल.भीम नगर, त्रिशरण चौक, पोष्ट ऑफिस, काळा मारुती चौक या मार्गावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर चौकपर्यंत ही मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी जयंती उत्सव समितीचे आजी - माजी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

 
Top