कळंब (प्रतिनिधी)- येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय याठिकाणी उच्च न्यायालय मुंबई यांचे निर्देशाप्रमाणे  जिल्हा न्यायालय उस्मानाबाद यांचे मार्गदर्शनाखालील दि. 01 जुलै, पासून अंमलात येत असलेल्या नवीन फौजदारी कायद्याच्या अनुषंगाने तालुका न्यायालयातील वर्ग-3 कर्मचारी यांचेकरीता दिनांक 30 जून रोजी प्रशिक्षण  कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते.

कार्यशाळेकरीता अध्यक्ष म्हणून जिल्हा न्यायाधीश-1 आर. के. राजेभोसले हे तर प्रमुख अतिथी म्हणून दिवाणी न्यायाधीश व. स्तर एन. ए. इंगळे, सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर आर. पी. बाठे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर श्रीमती ए. सी. जोशी, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर एम. ए.शेख हे उपस्थित होते. 

सदरील कार्यशाळेमध्ये दि. 01 जुलै पासून नव्याने अंमलात येत असलेल्या नवीन फौजदारी कायद्यांसंबंधी न्यायालयीन कर्मचाऱ्यांना माहिती व्हावी. या अनुषंगाने उपस्थित न्यायिक अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सुरूवातीला एम. ए. शेख, 3 रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तर आर. पी. बाठे, सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब यांनी भारतीय न्याय संहिता 2023 या नवीन कायद्यामधील विविध कलमांची माहिती दिली. त्यानंतर श्रीमती ए. सी. जोशी मॅडम, 2 रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब यांनी भारतीय साक्ष अधिनियम 2023 याविषयी मार्गदर्शन करताना कर्मचाऱ्यांनी सर्व नवीन फौजदारी कायद्यांविषयी जाणून घेणे आवश्यक असल्याचे नमूद केले.

कार्यशाळेच्या अनुषंगाने बोलत असताना एन. ए. इंगळे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांनी सर्व नवीन फौजदारी कायद्यांतील तरतूदींवर प्रकाश टाकत न्यायालयीन कर्मचारी यांनी त्यानुसार कार्यवाही करणे अपेक्षित असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आर. के. राजेभोसले, जिल्हा न्यायाधीश-1 कळंब यांनी न्यायालयीन कर्मचारी यांनी नवीन फौजदारी कायद्याचा अभ्यास करताना जून्या आणि नवीन कायद्यातील तरतूदीमध्ये असलेले फरक माहिती करून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच नवीन फौजदारी कायद्यांच्या अनुषंगाने होणारे बदल हे आत्मसात करणे गरजेचे आहे, असे नमूद केले. सदरील कार्यशाळेकरीता कळंब न्यायालयातील वर्ग-3 संवर्गातील न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

 
Top