धाराशिव (प्रतिनिधी)-मागील काही दिवसापासून जिल्ह्यातील विविध भागात अवेळी पाऊस व वादळी वाऱ्याने घरे, दुकाने, कुकुटपालन शेड, फळबागा यांचे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीत खूप मोठे आर्थिक नुकसान झालेल्या आपत्तीग्रस्तांना अपवादात्मक व विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी  आपण प्रयत्नशील राहू असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नागरिकांना दिला आहे. तसेच झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

आठवडाभरात वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे. विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. त्यामुळे अनेक भागात वीज पुरवठा ठप्प झाला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी  येरमाळा येथे भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. येथील हॉटेल व्यावसायिक श्री राजाभाऊ टेकाळे यांनी नवीनच चालू केलेल्या हॉटेल ला अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला असून यामध्ये हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हॉटेल मधील सर्व सामान, पत्रे दूरवर उडून गेले आहेत. तसेच श्री सुनील बारकुल यांच्या कुक्कुटपालन च्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे कुक्कुटपालन शेडमधील पक्षी दगावले असून, पत्रे उडून गेले आहेत. या नुकसानीची त्यांनी पाहणी केली.

तसेच गावातील इतरही नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेले आहेत. नैसर्गिक आपत्तीच्या काळात कृषी, ग्रामविकास व महसूल प्रशासनाने एकत्रितपणे काम करणे अपेक्षित असून त्याप्रमाणे तात्काळ पंचनामे पूर्ण करून शासनाला अहवाल पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांना देखील वादळी वाऱ्यामुळे खंडित होत असलेला वीज पुरवठा युद्ध पातळीवर पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नैसर्गिक आपत्तीच्या निकषाप्रमाणे अनुज्ञेय अनुदान व प्रत्यक्ष झालेले नुकसान यामध्ये मोठी तफावत असून काही ठिकाणी फारच मोठे नुकसान झाले आहे. अशा काही ठराविक ठिकाणी जेथे नुकसानीची व्याप्ती फार मोठी आहे. अशा ठिकाणी अपवादात्मक बाब म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा माध्यमातून अधिकच्या मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. यावेळी माझी जिल्हा परिषद सदस्य मदन बारकुल, माजी पंचायत समिती सभापती विकास बारकुल, सोमनाथ बारकुल, प्रितेश बारकुल, संतोष बारकुल, विलास बारकुल, उघडे व बालाजी बारकुल व गावातील नागरिक यावेळी उपस्थित होते.

 
Top