पुणे (प्रतिनिधी)-महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात  धनगर समाज विखुरलेला आहे. आजपर्यंत विकास या शब्दाच्या नावाखाली या सामाजाची फक्त आबाळचं झाली. धनगर समाज म्हणजे अडाणी, अशिक्षित, गांवढळ अशीच ओळख या  समाजाची अजूनही  आहे. अजून ही धनगर समाज आपली मेंढरे हाकत रानोमाळ फिरत आहे. निवडणूका येतात आणि जातात या निवडणुकांमध्ये समाजाला धनगर आरक्षण आणि मेंढी चराई क्षेत्र यांचे फक्त गाजर दाखवले जाते. जाहीरनाम्यात मोठं मोठ्या गोष्टी बोलून निवडणूका संपल्या की या समाजाकडे दुर्लक्ष केले जाते.

धनगर समाजाचे लोकप्रतिनिधी ही केवळ बोटांवर मोजण्याइतकेच. सुरुवातीला मोठं मोठी आश्वासने देऊन गरजेच्या वेळी धावून येणारा एकही लोकप्रतिनिधी या समाजाला लाभलेला नाही. पोट भरण्यासाठी रानोरान भटकणाऱ्या या मेंढपाळ बांधवांवर नेहमी हल्ले होतात. सरकारकडे यासाठी दाद मागून ही दुर्लक्ष केले जाते. 2022 साली  महाराष्ट्रात सातारा, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, धाराशिव अश्या अनेक ठिकाणी मेंढपाळ बांधवांवर हल्ले झाल्याच्या  बेसुमार घटना घडल्या. आणि याचा निषेध करण्यासाठी एक धनगर कन्या अखेर समोर आली. ही धनगरांची लेक म्हणजे डॉ. स्नेहा सोनकाटे ताई. लहानपणापासून अन्यायाविरुद्ध लढा देण्याचा आणि आपल्या समाजबांधवांसाठी काहीतरी करण्याचे बाळकडू मिळालेल्या स्नेहा ताईनी समाजातील लोकांवर होणारे अत्याचार कमी करण्याच्या दृष्टीने एक चळवळ सुरू करतात. याच एक उत्तम उदाहरण म्हणजे 26 जुलै 2023 रोजी आझाद मैदानावर झालेले आंदोलन. आपल्या बांधवांवर होणारे अत्याचार थांबावेत त्यांच्या भटक्या जीवनात त्यांना अजून अडचणी येऊ नयेत यासाठी उभारलेले हे आंदोलन. ताईंनी या आंदोलनात समाजावर होणाऱ्या अन्यायाचा पाढाचं वाचला. त्यांच्या या आंदोलनाला महाराष्ट्रातील असंख्य बांधवांनी पाठिंबा दिला आणी अखेर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यांना आपले प्रश्न मांडण्याची संधी दिली. 

स्नेहाताईंनी या आंदोलनातून आपल्या मागण्या मांडल्या. धनगर मेंढपाळ समाज बांधवांना संपूर्ण महाराष्ट्र भर चराई क्षेत्र उपलब्ध करून द्यावे, धनगर मेंढपाळ बांधवांच्या मेंढीचा संरक्षण विमा कवच द्यावे, राज्य सरकारने धनगर समाजा ची एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणे. धनगर मेढपाळांना बंदूक परवाना देणे.धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी विभागीय जिल्हास्तरीय स्तरावर वस्तीगृह बांधण्यात यावी. धनगर एसटी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत एनटी सी आरक्षण 3.5% वरून 7% करण्यात यावे. शेळी विकास महामंडळाला दरवर्षी 500 कोटी निधी देण्यात यावा.छ. संभाजीनगर येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय निर्मिती करण्यात यावी.तांडा वस्ती योजने तुन धनगर वस्तीमध्ये विकास कामांना निधी उपलब्ध करून द्यावे.

हे आंदोलन झाल्यानंतर 4 महिने या गोष्टींचा आणि मागण्यांचा पाठपुरावा करून अखेर ताईंच्या या लढ्याला यश प्राप्त झाले. मेंढपाळ वन क्षेत्रात मेंढ्या, शेळ्या चरायला घेऊन  जाण्याबाबत राज्य सरकारने  फलटण जि. सातारा सह राज्यातील इतर वनक्षेत्रात मेंढ्या चराईसाठी परवानगी दिली. आणि  येत्या काही  दिवसांमध्ये चराईसाठी महाराष्ट्रातील मेंढपाळ बांधवांना पास उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

याबाबत स्नेहाताईंसोबत बोलताना त्या असं म्हणाल्या की ही फक्त सुरवात आहे अश्या अनेक समस्या आणि प्रश्नांना धनगर समाज तोंड देत आहे.  आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी तसेच हे भटकंतीचे आयुष्य थांबवण्यासाठी  जितके प्रयत्न करता येतील तितके प्रयत्न मी करेन. धनगर समाजाची सुरुवातीपासून सुरू असलेली होरपळ कमी करण्याच्या दृष्टीने आता काम करणार आहे. ताई समाजासाठी करीत असलेले काम उल्लेखनीय आहे. त्यांनी समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांचे आभार. 


 
Top