धाराशिव / प्रतिनिधी-

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी-मार्च-२०२३ दि.21 फेब्रुवारी 2023 ते दि. 21 मार्च 2023 या कालावधीमध्ये जिल्ह्यामधील विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहेत. तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षा मार्च-2023 दि.02 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीमध्ये जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहेत.

 या परीक्षेचे संचालन सुयोग्य प्रकारे व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलेले असून त्यास विविध  प्रसिद्धी माध्यमाद्वारे पुरेशी प्रसिद्धी दिलेली आहे. हा वेळापत्रक सध्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांच्या विषयानुसार सदर विषयनिहाय वेळापत्रकाची माहिती त्यांच्या प्रवेशपत्रावर (Hallticket) देण्यात आलेली आहे. तसेच मंडळामार्फत या वेळापत्रकाची एक प्रत प्रत्येक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय/स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय/वरिष्ठ महाविद्यालयास जोडून असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयास उपलब्ध करून दिलेली आहे.  राज्य मंडळाच्या अधिकृत वेळापत्रकाची माहिती प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांना दिलेली आहे.

 परंतु काही खाजगी प्रकाशकांनी राज्य मंडळाने प्रकाशित केलेल्या वेळापत्रकातील परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करून चुकीचे वेळापत्रक प्रसिद्ध केलेली आहेत.  चुकीच्या वेळापत्रकामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण होण्याची शक्यता आहे.

 राज्य मंडळाने प्रसिध्द केलेले वेळापत्रक हेच अंतिम वेळापत्रक आहे. तसेच या वेळापत्रकाची माहिती प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रवेशपत्रावर देण्यात आलेली आहे. त्यानुसार विद्यार्थ्याने परीक्षेस उपस्थित राहणे आवश्यक आहे. या संदर्भात विद्यार्थी किंवा पालक यांना काही समस्या किंवा काही अडचणी निर्माण झाल्यास जिल्हा नियंत्रण कक्ष उस्मानाबाद येथे संपर्क साधावा. त्यासाठी गजानन सुसर, शिक्षणाधिकारी (माध्य.) (८८८८२२०८८८), रावसाहेब मिरगणे, उपशिक्षणाधिकारी (माध्य.) (८३०८३४३८३८) किंवा यरमुनवाड वी. के., विस्तार अधिकारी (शिक्षण), (८२०८५६६५८४) यांच्याशी संपर्क करावा. असे आवाहन  शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद  यांनी केली आहे


 
Top