उस्मानाबाद /प्रतिनिधी -

जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे  श्री. भारत शिंगाडे, अधीक्षक अभियंता, उस्मानाबाद पाटबंधारे मंडळ, उस्मानाबाद यांचे समवेत दिनांक 30 ऑक्टोबर 2022 रोजी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गतच्या घटक कामांना भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाचा व शाश्वत सिंचन होणान्या तसेच पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणार्‍या कृष्णा मराठवाडा प्रकल्पांतर्गतच्या घटक कामांची सविस्तर पाहणी करून कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा स्त्रोत निरा नदीवरील उध्दट बॅरेज, निरा-भिमा जोड बोगद्यापासुन ते उस्मानाबाद जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत प्रकल्प समजुन घेऊन प्रकल्पाच्या कामाचे विविध टप्पे अधीक्षक अभियंता यांचेकडुन जाणुन घेतले.

मा. जिल्हाधिकारी यांनी तुळजापूर, उमरगा व लोहारा तालुक्यासाठी 2.24 अघफु पाणीवापर व 10862 हेक्टर सिंचन क्षेत्र असलेल्या उपसा सिंचन योजना क्र. 2 अंतर्गत रामदरा साठवण तलाव, पांगदरवाडी पंपगृह, पडसाळी पंपगृह व घाटणे बॅरेज या घटक कामांना भेट दिली. पहाणी वेळी श्री. कृष्णा घुगे, कार्यकारी अभियंता यांनी मा. जिल्हाधिकारी यांना उपसा सिंचन योजना क्र. 2 मधील प्रथम टप्पा घाटणे बॅरेज ता.मोहोळ जि.सोलापूर येथे 2.24 अधफुफ पाणी साठवण्यात येणार असुन पंपगृहाव्दारे उध्दरण नलीकेतून कालव्यात पाणी सोडल्यानंतर ते पाणी पडसाळी, सावरगाव, पांगरदरवाडी, डोंगरी सिंदफळ व रामदरा अशा एकुण 6 टप्प्यात साठवण तलावामध्ये पाणी साठवून सिंचनाचे व पिण्याच्या पाण्याचे नियोजन आहे असे विषद केले. तसेच या प्रकल्पाचा मुख्य स्त्रोत असलेल्या उध्दट बॅरेज व निरा भिमा जोड बोगद्या विषयीच्या अभियांत्रिकी बाबी विषद केल्या.

परंडा, भूम, वाशी, कळंब व उस्मानाबाद तालुक्यासाठी 3.08 अधफु पाणीवापर व 14936 हेक्टर सिंचन क्षेत्र असणान्या उपसा सिंचन योजना क्र.1 अंतर्गत जेऊन बोगदा व मिरगव्हाण पंपगृह या कामांना भेट दिली. उपसा सिंचन योजना क्र. 1 व 2 साठी जेऊन बोगदा व मिरगव्हाण पंपगृह या कामांना भेट दिली. या योजनेचे अभियांत्रिकी कौशल्याचे व जमीनीखाली 77.78 मीटर खोलीवर असलेल्या जेऊन बोगदा शाफ्ट क्र. 6 (सौंदे) येथे बोगद्यामध्ये उतरून कामाची पाहणी केली. यावेळी बोगद्याच्या अभियांत्रिकी बाबी जसे की बोगद्याचा तळउतार, विसर्ग, वायु विजन व विस्फोटन  सुरक्षा विषयक बाबी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता श्री. प्रविण चावरे यांनी जिल्हाधिकारी महोदय यांना विषद केल्या. जिल्हाधिकारी यांनी प्रकल्पावरील सर्व उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता, सहाय्यक अभियंता श्रेणी-2, कनिष्ठ अभियंता तांत्रिक कर्मचारी व प्रकल्पाचे काम करणारे कामगार यांची अस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांच्याशी संवाद साधला व त्यांचे मनोबल वाढविण्याचे काम केले.

योजनेचे उस्मानाबाद जिल्ह्यासाठी प्रवेशव्दार असलेल्या सिना कोळेगाव प्रकल्पाच्या काठावरील अतिशय महत्वाच्या अशा मिरगव्हाण पंपगृहाचीही पाहणी मा. जिल्हाधिकारी यांनी केली. महाराष्ट्रातील सर्वात मोठे व सिना काठावरील काळ्या मातीत 1970 अश्वशक्ती चे 7 पंप असणार्‍या क्षेत्रीय दृष्ट्या अव्हानात्मक अशा मिरगव्हाण पंपगृहाची पहाणी मा. जिल्हाधिकारी महोदय यांनी केली. त्यावेळी मिरगव्हाण चे सरपंच यांनी पुष्पगुच्छ देऊन मा. जिल्हाधिकारी यांचे स्वागत केले व या प्रकल्पासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे अश्वासन दिले. मा. जिल्हाधिकारी यांनी सर्व कामांबाबत समाधान व्यक्त करून योजनेला गती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने योग्य ते सहकार्य करण्यात येईल असे अश्वासन सर्व उपस्थित अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्तांना दिले.

 
Top