उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद तालुक्यातील आंबेवाडी येथील रस्त्यावरुन लातूरच्या दिशेने अवैध कत्तलीतील गोवंशीय मांसाची वाहतुक होणार असल्याची गोपनीय माहिती बेंबळी पोलिस ठाण्यास पहाटे मिळाली होती. त्यानुसार बेंबळी पोलिस ठाण्याच्या पथकाने सोमवारी पहाटे आंबेवाडी गावातील चौकात सापळा लावत “अवैध कत्तलीतील गोवंशीय मांसाची वाहतुक करणाऱ्याला पकडून त्यावर गुन्हा दाखल केला.
सकाळी ७.२० उस्मानाबादकडून उजनीकडे जाणारा आयशर ट्रक क्र. एम.एच. ४२ एक्यू ४७३९ हा पोलिसांनी संशयावरून थांबवून त्याच्या हौद्यात डोकावून पाहिले. त्यावेळी आत गोवंशीय मांस व बर्फाचे तुकडे दिसून आले. यावर पोलिसांनी ट्रकचा चालक- मजहर सत्तार कुरेशी, रा. खिरणीमळा, उस्मानाबाद यांस त्या मांस वाहतुक परवान्याबाबत विचारले असता परवाना नसल्याचे त्यांनी सांगीतले. यावर पथकाने अंदाजे पाच लाख किमतीच्या ट्रकसह त्यातील अंदाजे १२ लाख किंमतीचे सुमारे आठ मेट्रिक टन गोवंशीय मांस जप्त करुन प्रयोगशाळा परीक्षणाकरिता पशुधन विकास अधिकारी, बेंबळी डॉ. कालीदास सुतार यांच्यामार्फत मांसाचे नमुने काढले आहेत. तसेच जप्त मांस हा नाशवंत पदार्थ असल्याने तत्काळ नष्ट करण्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांच्याकडे विनंती पत्र पाठवले आहेत. त्यांची संमती मिळताच तो मांस साठा नष्ट केला जाणार आहे. या प्रकरणी बेंबळी पोलिस ठाण्याचे अंमलदार- राजाराम झाकडे यांनी ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत बेंबळी पोलिस ठाण्याचे प्रभारी मच्छिंद्रनाथ शेंडगे, पोना- राजाराम झाकडे, रविकांत जगताप, ज्ञानेश्वर गुरव यांच्या पथकाने केली आहे.