तुळजापूर / प्रतिनिधी-

तुळजाभवानी मातेच्या नवरात्रापूर्वीच्या मंचकी निद्रेस बुधवारी (दि.२९) सायंकाळी प्रारंभ झाला. सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी माता शेजगृहातील पलंगावर विसावली. तत्पूर्वी सेवेकरी पलंगे कुटुंबीयांनी मंचकी निद्रेसाठी पलंग घासूनपुसून स्वच्छ धुऊन घेतला, तर आराधी महिलांनी गाद्यांचा कापूस पिंजला. दरम्यान, आठ दिवसांची मंचकी निद्रा संपवून ७ ऑक्टोबर राेजी घटस्थापनेदिनी पहाटे तुळजाभवानी माता सिंहासनावर विराजमान होईल.

तुळजाभवानी मातेच्या नवरात्रास ७ ऑक्टोबरपासून घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. तत्पूर्वी ८ दिवस तुळजाभवानी माता मंचकी निद्रेसाठी पलंगावर विसावते. बुधवारी सकाळपासूनच सेवेकरी पलंगे यांनी देवीचा चांदीचा पलंग घासूनपुसून स्वच्छ धुऊन घेतला. त्यानंतर पलंगावर नवीन नवार पट्ट्या बांधून घेतल्या. त्याच वेळी मोजक्याच आराधी महिलांच्या उपस्थितीत गाद्यांचा कापूस पिंजून घेतला. त्यानंतर नवीन गाद्या पलंगावर ठेवण्यात येऊन मंचकी निद्रेसाठी पलंग सज्ज ठेवण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत मोजक्याच पुजारी, सेवेकरी आणि मानकऱ्यांच्या उपस्थितीत सर्व विधी परंपरेप्रमाणे पार पडले.

मुस्लिम समाजाला मान : तुळजाभवानी मातेचा मंचकी निद्रेसाठी गाद्यांचा कापूस पिंजण्याचा मान मुस्लिम समाजाला आहे. शम्मू बाशुमिया पिंजारी यांच्याकडे परंपरागतपणे हा मान चालत आलेला आहे. शम्मू पिंजारी यांनी गाद्यांचा कापूस पिंजला. त्यांना त्यांच्या पत्नीने साहाय्य केले.

पलंगावरच प्रक्षाळ पूजा : सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर खंडोबाचे पुजारी वाघे यांनी आणलेला भंडारा देवीच्या मूर्तीला लावून “आई राजा उदो उदो’च्या जयघोषात देवीची मूर्ती सिंहासनावरून हलवून पलंगावर ठेवण्यात आली. तत्पूर्वी गाभाऱ्यात दोन धार्मिक विधी उरकण्यात आले. त्यानंतर पलंगावरच प्रक्षाळ पूजा करण्यात आली.

तुळजाभवानी देवी वर्षभरात २१ दिवस पलंगावर : देशभरातील ५१ शक्तिपीठांपैकी केवळ कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी एकमेव चलमूर्ती असून इतर ठिकाणी उत्सव मूर्ती हलवण्यात येते. तुळजाभवानी देवी वर्षभरात तीन वेळा एकूण २१ दिवस मंचकी निद्रा घेते. यामध्ये शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी ८ दिवस, सीमोल्लंघनानंतर ५ दिवस व शाकंभरी नवरात्रोत्सवापूर्वी ८ दिवस देवी पलंगावर मंचकी निद्रा घेत असते.


 
Top