मुरूम (प्रतिनिधी)- फार्मसी क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या विस्तीर्ण संधी उपलब्ध असून, सामाजिक भान राखून व जबाबदारीने काम करण्याची गरज आहे. औषध निर्मिती क्षेत्रात सतत नवे तंत्रज्ञान आणि संशोधनाशी जोडून राहावे. कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि रुग्णसेवा ही मूल्ये जपल्यास यश निश्चित मिळते; त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःचे करिअर स्वतः निवडून यश संपादन करावे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त विभागीय व्यवस्थापक डॉ. शिवाजीराव शिंदे यांनी केले.
येथील माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आयोजित प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात शुक्रवारी (ता. 20) ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. महेश्वर होगाडे, प्रा. डॉ. रवींद्र गायकवाड, प्रा. डॉ. महेश मोटे, प्रा. डॉ. रवींद्र आळंगे, प्रा. डॉ. सुजित मटकरी, प्रा. प्रियांका काजळे, प्रा. वैष्णवी पाटील, प्रा. सरस्वती शेवाळकर, प्रा. सुदीप ढंगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. महेश मोटे यांनी विद्यार्थ्यांना ‘अभ्यासासोबतच उत्तम माणूस घडवा', असा मौलिक संदेश दिला. तर ‘कठोर परिश्रम हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे,' असे मत डॉ. रवींद्र आळंगे यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. बिराजदार म्हणाले की, भविष्यात तुम्ही मोठे संशोधक, यशस्वी उद्योजक किंवा नावाजलेले फार्मसिस्ट व्हाल; तेव्हा तुमच्या यशात या महाविद्यालयाचा सहभाग असेल, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटेल. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. हर्षद बदोले, किशोर कारभारी, नितीन कंटेकुरे यांनी विशेष पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महेश्वर होगाडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सना जमादार तर आभार प्रा. योगेश पाटील यांनी मानले. समारंभास विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
