परंडा(प्रतिनिधी)- राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी जनतेच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात ‘काळी दिवाळी' आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनांतर्गत रविवार, दि. 8 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 1 ते 4 या वेळेत धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी-भाकर खाऊन शासनाचा निषेध नोंदविण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के यांनी दिली.यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित पीक आलेले नाही. अनेक ठिकाणी पिके करपून गेली असून जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ग्रामीण भागात शेतमजुरांना काम मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच महागाई, बेरोजगारी आणि वाढत्या आर्थिक अडचणींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिकच कठीण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, पीकविम्याची नुकसानभरपाई, हेक्टरी आर्थिक मदत, शेतमजुरांना विशेष आर्थिक सहाय्य तसेच जनावरांसाठी चारा व नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची तातडीने व्यवस्था करावी, अशा प्रमुख मागण्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येणार आहेत. शासनाकडून या प्रश्नांवर अपेक्षित ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोपही पक्षाने केला आहे. ‘काळी दिवाळी' आंदोलनाच्या माध्यमातून शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदवून दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठविण्यात येणार आहे. सणासुदीच्या काळातही ग्रामीण भागातील जनतेला मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागत असल्याने शासनाने त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी भूमिका पक्षाच्या वतीने मांडण्यात येणार आहे.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे सर्व जिल्हा पदाधिकारी, विविध आघाड्यांचे अध्यक्ष व महासचिव, तालुका व शहर पदाधिकारी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, फुले-आंबेडकर विद्वत सभा, कामगार आघाडी तसेच सर्व आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के यांनी केले आहे. तसेच शेतकरी, शेतमजूर, बांधकाम कामगार, कंत्राटी कामगार, मिस्त्री, पेंटर, अलुतेदार-बलुतेदार आणि सर्व कष्टकरी बांधवांनीही या आंदोलनात सहभागी होऊन आपल्या न्याय्य मागण्यांसाठी एकजूट दाखवावी असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.