धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा ग्रंथालय कार्यालय, धाराशिव आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, धाराशिव येथील मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिनानिमित्त परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन युवराज नळे यांच्या हस्ते झाले. या परिसंवादाला विद्यार्थ्यांचा आणि वाचनप्रेमी रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमात ५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला, तर मोठ्या संख्येने रसिक श्रोते उपस्थित होते.
प्रारंभी माजी राष्ट्रपती डॉ . एपीजी अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर हनुमंत ढाकणे यांनी सर्व मान्यवरांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत केले. वाचन संस्कृतीचा प्रसार करणे, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि समाजात वैचारिक प्रगल्भता वाढविणे हा या परिसंवादाचा प्रमुख उद्देश होता. वाचन हे केवळ ज्ञानप्राप्तीचे साधन नसून व्यक्तिमत्त्व विकासाचे आणि समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, असे विचार यावेळी व्यक्त करण्यात आले. या परिसंवादाच्या प्रमुख उपस्थितीत प्रा. राजा जगताप हे होते, अध्यक्षस्थानी व्यंकटेश महाजन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. प्रशांत चौधरी होते. परिसंवादात प्रा. डॉ. अरविंद हंगरगेकर आणि सौ. उज्ज्वला शिंदे यांनी सहभाग घेतला. त्यांनी वाचनाचे महत्त्व, बदलत्या काळातील वाचनसंस्कृती, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासातील पुस्तकांचे स्थान आणि डिजिटल युगातील वाचनासमोरील आव्हाने या विषयांवर आपले विचार मांडले.
आजच्या डिजिटल युगात वाचनसंस्कृती जपणे आणि ती नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे. मोबाईल आणि समाजमाध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे पुस्तकवाचनाची सवय कमी होत असताना विद्यार्थ्यांनी दर्जेदार साहित्याचे वाचन करावे. कथा, कादंबऱ्या, कविता, चरित्रे आणि वैचारिक ग्रंथांच्या माध्यमातून जीवनाकडे पाहण्याचा व्यापक दृष्टिकोन विकसित करावा, असे आवाहन परिसंवादातील वक्त्यांनी केले. वाचनामुळे व्यक्तीच्या विचारांना दिशा मिळते, भाषिक कौशल्ये विकसित होतात आणि सामाजिक प्रश्नांकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे शैक्षणिक संस्थांसह सार्वजनिक ग्रंथालयांनी वाचन चळवळीला अधिक व्यापक स्वरूप देण्याची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
जिल्हा ग्रंथालय कार्यालय आणि महाविद्यालयाच्या मराठी विभागाने संयुक्तपणे आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना साहित्य, वाचन आणि वैचारिक चर्चेची प्रेरणा मिळाली. विद्यार्थ्यांसह रसिक श्रोत्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी हनुमंत ढाकणे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. कृष्णा तेरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा ग्रंथालय कार्यालय कर्मचारी तसेच प्रा. डॉ. वैशाली बोबडे, प्रा. सुवर्णा गेंगजे व प्रा. सुशेन जाधवर यांनी विशेष परिश्रम घेतले.या उपक्रमाच्या माध्यमातून वाचनसंस्कृतीचा प्रसार आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा कार्यक्रम रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर व जिल्हा माहिती अधिकारी हनुमंत ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
