धाराशिव (प्रतिनिधी)- अक्षरवेल महिला साहित्य मंडळाच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या ‘अंकुर' दिवाळी अंकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नयन राजमाने यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. साहित्यिक अभिरुची जोपासण्यासोबतच विविध सामाजिक विषयांवर जनजागृती करणाऱ्या या दिवाळी अंकाने मंडळाच्या सातत्यपूर्ण साहित्यसेवेच्या प्रवासात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
या प्रकाशन सोहळ्यास अक्षरवेल महिला साहित्य मंडळाच्या विद्यमान अध्यक्ष डॉ. सुलभाताई देशमुख, ‘अंकुर' दिवाळी अंकाच्या कार्यकारी संपादक कमलताई नलावडे, मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. रेखा ढगे, अक्षरवेल महिला मंडळाच्या उपाध्यक्ष आणि जेष्ठ गझलकारा स्नेहलता ताई अंदुरे, प्रेमाताई पाटील, कवयित्री सुनिता बोरगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नयन राजमाने म्हणाल्या, “सातत्याने वीस वर्षे दिवाळी अंक प्रकाशित करणे ही निश्चितच सोपी गोष्ट नाही. अक्षरवेल महिला साहित्य मंडळाने आपल्या अथक प्रयत्नांतून हे शक्य करून दाखविले आहे. दिवाळी अंकासाठी दरवर्षी वेगवेगळे विषय निवडून त्याद्वारे सामाजिक जनजागृती करण्याचा मंडळाचा उपक्रम अतिशय स्तुत्य आणि प्रेरणादायी आहे.” मंडळाच्या या साहित्यिक वाटचालीचे त्यांनी विशेष कौतुक केले.
कार्यकारी संपादक कमलताई नलावडे यांनी अक्षरवेल महिला साहित्य मंडळाच्या माध्यमातून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध साहित्यिक व सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला. या साहित्यिक चळवळीला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त व्हावे, यासाठी नव्या पिढीतील तरुणींनीही या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. रेखा ढगे यांनी प्रास्ताविकातून अक्षरवेल महिला साहित्य मंडळाच्या स्थापनेपासून आजवरच्या वाटचालीचा सविस्तर आढावा घेतला. एका छोट्याशा साहित्यिक संकल्पनेतून रुजलेले हे रोपटे आज अनेक साहित्यिक आणि सामाजिक उपक्रमांची सावली देणाऱ्या वटवृक्षात कसे रूपांतरित झाले, याचा प्रेरणादायी प्रवास त्यांनी उलगडून सांगितला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ. सुलभाताई देशमुख यांनी अध्यक्षीय समारोप करताना मंडळाच्या कार्याचा विस्तृत आढावा घेतला. अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर साहित्यिक कार्यक्रमांसोबतच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन वर्षभर कशा पद्धतीने केले जाते, याची माहिती त्यांनी दिली. साहित्य हे केवळ अभिव्यक्तीचे माध्यम नसून समाजाशी संवाद साधण्याचे आणि सामाजिक परिवर्तन घडविण्याचे प्रभावी साधन आहे, ही भूमिका मंडळाच्या कार्यातून अधोरेखित होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉ.नयन राजमाने यांचा परिचय प्राची नाईकवाडी यांनी दिला. तर शिवनंदा माळी यांनी अक्षरवेल महिला साहित्य मंडळाचा आर्थिक अहवाल सादर केला. साहित्यिक विचारांची देवाणघेवाण, महिलांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ आणि सामाजिक जाणिवांची रुजवणूक अशा विविध उद्दिष्टांना समर्पित असलेल्या अक्षरवेल महिला साहित्य मंडळाच्या या प्रकाशन सोहळ्याला ज्येष्ठ व कनिष्ठ साहित्यप्रेमी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सुनीता गुंजाळ यांनी केले, तर जयश्री फुटाणे यांनी आभार मानले.
