धाराशिव (प्रतिनिधी)- दुष्काळग्रस्त धाराशिव जिल्ह्यातील एपीएल केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना रेशनच्या लाभासाठी सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी गावपातळीवरच अर्ज स्वीकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पात्र असूनही एकही कुटुंब अन्नधान्याच्या लाभापासून वंचित राहू नये, या उद्देशाने ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील 14 हजार 393 पात्र लाभार्थ्यांना प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेअंतर्गत अन्नधान्याचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यानुसार गावपातळीवर अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
जिल्ह्यातील अनेक केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना धान्य ऐवजी निर्धारित रक्कम मिळत आहे. एकीकडे दुष्काळामुळे कुटुंबांच्या उत्पन्नावर परिणाम झाला असताना दुसरीकडे अन्नधान्यासाठीही अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत पात्र लाभार्थ्यांना धान्य मिळवून देण्याची भूमिका आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतली आहे. ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांना अर्ज करण्यासाठी वारंवार तहसील कार्यालयात जावे लागू नये, यासाठी तलाठी, किंवा रास्त भाव दुकानदार यांच्याकडे गावातच अर्ज स्वीकारले जातील. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी शक्यतो उपलब्ध शासकीय अभिलेखांच्या आधारे करावी. गरजेनुसार गावातच अर्ज व हमीपत्र भरून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सहकार्य करेल. प्राप्त अर्जांची पात्रतेनुसार तातडीने पडताळणी करून मंजूर लाभार्थ्यांना नियमानुसार अन्नधान्याचा लाभ सुरू करण्यासाठी कालबद्ध कार्यपद्धती निश्चित करून विशेष मोहीम राबविण्याचे ठरले असल्याच्या माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
