कळंब (प्रतिनिधी)-कळंब तालुक्यात गेल्या २६ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप पिके सुकू लागली आहेत. नदी-नाले, ओढे कोरडे पडत असून पावसाअभावी शेतकरी चिंतेत आहेत. दुष्काळाचे सावट गडद होत असताना पाऊस पडावा, सृष्टी हिरवीगार व्हावी आणि जीवमात्रांचे सुख-समाधान व कल्याण व्हावे, यासाठी नागरिकांकडून पारंपरिक पद्धतीने परमेश्वराची आळवणी केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर कळंब शहरातील तांदुळवाडी रस्त्यावरील संत ज्ञानेश्वर बालकआश्रम येथे सोमवार, दि. २४ ऑगस्ट रोजी पर्जन्ययागाचे आयोजन करण्यात आले. ह.भ.प. महादेव महाराज अडसूळ यांच्या पुढाकारातून झालेल्या या पर्जन्ययागात वरुणराजाने कृपा करावी, भरपूर पाऊस पडावा आणि शेतकरी व सर्व जीवमात्र सुखी-समाधानी राहावेत, यासाठी प्रार्थना करण्यात आली.
पर्जन्ययागात समिधा व आहुती देण्यासाठी ॲड. मनोज चोंदे, विठ्ठल माने, अनिल यादव, डॉ. शोभा व पुरुषोत्तम पाटील (दांपत्य), प्रकाश भडंगे, अश्रुबा व कोठावळे (दांपत्य), सरस्वती अडसूळ, सुनीता अडसूळ, आशा कोल्हे, पोपट साळवे, धनंजय मोरे, बाबू पौळ, कल्याण खापे, ज्ञानेश्वर इंगळे, आबा काळे व परमेश्वर खडबडे यांनी सहभाग घेतला.
यावेळी सुभाष घोडके, प्रा. घोळवे, माधवसिंग राजपूत, राजेंद्र बिककड, महादेव खराटे व सागर जाधव यांची उपस्थिती होती. यज्ञाचे पौराहित्य पारेकर महाराज यांनी केले.
यज्ञामागील धार्मिक श्रद्धा
पर्जन्ययागाच्या माध्यमातून यज्ञाग्नीत समिधा व आहुती अर्पण करून पर्जन्यदेवतेचे आवाहन करण्याची परंपरा प्राचीन काळापासून असल्याचे ह.भ.प. महादेव महाराज अडसूळ यांनी सांगितले. पाऊस न पडल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊन जीवमात्रांवर संकट येते. अशा वेळी वेदपूर्व, वेदकालीन आणि वेदोत्तर काळात पर्जन्ययागाचे आयोजन केले जात असल्याची धार्मिक श्रद्धा आहे.
— ह.भ.प. महादेव महाराज अडसूळ, कळंब
