तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील सावरगाव येथे वर्षभर विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडतात. या कार्यात कमल मावशी गवळी यांचे योगदान विशेष उल्लेखनीय असून, त्यांच्या दातृत्वासोबतच मिळणारे मार्गदर्शन गावातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
कमल मावशींचे माहेर सावरगावातील काळदाते घराणे, तर सासरही याच गावातील गवळी घराणे आहे. त्यांचे पती स्वर्गीय पांडुरंग भाऊ हे गावातील नामांकित पैलवान म्हणून परिचित होते. कुस्ती क्षेत्रात लौकिक मिळवतानाच त्यांनी सामाजिक आणि धार्मिक कार्यातही सक्रिय सहभाग घेतला. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून व्यायाम आणि शारीरिक तंदुरुस्तीला महत्त्व द्यावे, धार्मिक कार्यात सहभागी व्हावे तसेच आई-वडिलांची सेवा करावी, असा संदेश ते सातत्याने देत असत.
मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठीही मदतीचा हात
कमल मावशींच्या दातृत्वातून सावरगावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि मारुती मंदिराच्या शिखराचा जीर्णोद्धार तसेच पालखी अर्पण करण्यात आले आहे. याशिवाय धामणगाव येथील बोधले महाराज मंदिराच्या जीर्णोद्धारासाठीही त्यांनी आर्थिक सहकार्य केले. चावडीतील दगडी गणपती मंदिराच्या जीर्णोद्धारासाठीही त्यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. धार्मिक उपक्रमांमध्येही त्यांचा सहभाग सातत्याने राहिला आहे. एकनाथ महाराज मंदिरातील सप्ताह, विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील सप्ताहादरम्यान अन्नदान सेवा तसेच श्री नागनाथ महाराज देवस्थानातील अन्नदान सेवा अशा विविध उपक्रमांना त्यांनी सहकार्य केले आहे.
धार्मिक परंपरेसोबत सेवाभावाची जपणूक
गावातील धार्मिक परंपरा आणि संस्कृती जपत असताना नव्या पिढीलाही या कार्यात सहभागी करून घेण्याचा कमल मावशींचा प्रयत्न असतो. त्यामुळे त्यांचे योगदान केवळ आर्थिक मदतीपुरते मर्यादित राहत नाही. अनुभव, मार्गदर्शन, सेवाभाव आणि दातृत्व यांचा सुंदर संगम त्यांच्या कार्यातून दिसून येतो. गावातील धार्मिक कार्यात अडचण निर्माण झाली किंवा एखाद्या उपक्रमासाठी मार्गदर्शनाची गरज भासली, तर कमल मावशी पुढाकार घेतात. गरजेनुसार आर्थिक मदतीचा हातही त्या पुढे करतात. त्यामुळे सावरगावच्या धार्मिक आणि सामाजिक वाटचालीत त्यांचे योगदान आदराचे आणि प्रेरणादायी ठरत आहे.
गावच्या धार्मिक कार्याला आधारवड
धार्मिक परंपरांचे जतन, सामाजिक बांधिलकी आणि नव्या पिढीला योग्य दिशा देण्याचे कार्य सावरगावात सुरू आहे. या कार्याला कमल मावशी गवळी यांच्या दातृत्वाची आणि अनुभवाची भक्कम साथ लाभत आहे. त्यामुळे गावच्या धार्मिक आणि सामाजिक कार्याला आधार देणाऱ्या मार्गदर्शक आणि आधारवड म्हणून कमल मावशींच्या योगदानाकडे पाहिले जात आहे.
