भूम (प्रतिनिधी)- त्रिमूर्ती शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित भगवंत विद्यालय, हाडोंग्री ता. भूम येथे माजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या कार्यक्रमात विद्यालयाचा नावलौकिक वाढविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. उदय प्रदीप तळेकर याची आयआयटी भोपाळ येथे अभियांत्रिकी शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल, तर तेजस प्रमोद सुरवसे याने सीईटी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धाराशिव, त्रिमूर्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. शांतलिंग घोंगडे, सुखदेव पालकर, माजी मुख्याध्यापक अनिल तळेकर, मुख्याध्यापक सुनिल डोके, प्रमोद सुरवसे, प्रदीप तळेकर, उपसरपंच रविंद्र लोमटे, भीमराव रामगुडवे, उद्धव रामगुडवे, विपुल तळेकर, अमोल जगदाळे यांच्यासह विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत यश संपादन करून आपल्या गावाचे व विद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे, असा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रकाश पवार यांनी केले. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

 
Top