धाराशिव (प्रतिनिधी)-  भाजप पक्षातील नेत्यांनी नव्याने पक्षात आलेल्या आमच्या सारख्या लोकांना मोठ्या मनाने सामिल करून घेतले, सन्मान दिला. त्यामुळेच भाजप आशिया खंडातील सर्वात मोठा पक्ष झाला आहे. असे प्रतिपादन धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आमदार बसवराज पाटील यांनी केले. 

आमदार बसवराज पाटील यांच्या सत्कारानिमित्त रूपामाता परिवाराच्यावतीने रविवारी धाराशिव येथे भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या सत्कार समारंभात आमदार बसवराज पाटील यांच्या सत्कारापेक्षा भाजपमधील अंतर्गत वाद यांचीच सर्वाधिक चर्चा रंगली. या सत्कार समारंभासाठी रूपामाता परिवाराचे व्यंकटराव गुंड यांनी भाजपमधील अनेक जुने आणि नवे नेते, तसेच महायुतीतील विविध पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते.  कार्यक्रम पक्षाचा नसून रूपामाता परिवाराचा असल्याने कोणाला निमंत्रण द्यायचे आणि कोणाला नाही, हा अधिकार आयोजकांचा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

या कार्यक्रमाला शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर हे महायुतीच्या व्यासपीठावर प्रथमच उपस्थित राहिले. यावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे, शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटील, रामदास कोळगे, माजी जिल्हा परिषद सदस्य कोंडाप्पा कोरे, ॲड. खंडेराव चौरे, शिवसेनेचे सुरज साळुंखे तसेच माजी नगराध्यक्ष मधुकर तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.  

माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी जुन्या आणि संघर्षातून पक्ष उभा करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य सन्मान मिळायला हवा, अशी भूमिका त्यांनी मांडली. विकासकामांच्या श्रेयवादावर माजी आमदार ठाकूर यांनी यावेळी मुद्देसुद माहिती दिली.  खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही भाषणात अप्रत्यक्ष टीकेचा सूर कायम ठेवला. व्यंकटराव गुंड तसेच ॲड. अनिल काळे यांनीही आपल्या भाषणात जुन्या कार्यकर्त्यांना योग्य सन्मान मिळत नसल्याची भावना व्यक्त केली. भाजपमधील वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी शुक्रवारी पदाधिकाऱ्यांचे कान टोचत नाराजी योग्य पक्षीय व्यासपीठावर मांडावी. प्रसारमाध्यमांमधून किंवा जाहीर कार्यक्रमांतून व्यक्त करू नये, असे आवाहन केले होते. यासंदर्भात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची काय प्रतिक्रिया येते याकडे लक्ष लागले आहे.

 
Top