धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शल्यचिकित्साशास्त्र विभागाला अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सुसज्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने तब्बल 13 कोटी 38 लाख 48 हजार 500 रुपयांच्या यंत्रसामुग्री व साधनसामुग्री खरेदीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना आधुनिक शल्यचिकित्सा उपचार सुविधा आता स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

वैद्यकीय शिक्षण विभागाने 21 ऑगस्ट 2026 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, सन 2026-27 या आर्थिक वर्षातील राज्य योजनांतर्गत उपलब्ध अनुदानातून ही यंत्रसामुग्री खरेदी करण्यात येणार आहे. शल्यचिकित्साशास्त्र विभागासाठी ॲडव्हान्स्ड लॅप्रोस्कोपिक सिस्टिम अर्थात अत्याधुनिक दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया प्रणाली, थेरप्युटिक एंडोस्कोपी टॉवर अर्थात उपचारात्मक अंतर्दर्शन यंत्रणा आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन युनिट अर्थात रेडिओ वारंवारिता आधारित ऊतक उपचार यंत्रणा आदींचा समावेश असलेली अत्याधुनिक यंत्रणा खरेदी केली जाणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी 13 कोटी 38 लाख 48 हजार 500 रुपयांचा अंदाजित खर्च निश्चित करण्यात आला आहे. या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीमुळे विविध प्रकारच्या दुर्बिणीद्वारे केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया, उपचारात्मक अंतर्दर्शन तसेच रेडिओ वारंवारितेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या उपचारांना अधिक सक्षम आधार मिळणार आहे. त्यामुळे धाराशिवसह जिल्ह्यातील रुग्णांना आधुनिक शल्यचिकित्सा उपचारांसाठी मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज भासणार नाही. 


 
Top