तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान" अंतर्गत तुळजापूर विधानसभा मतदारसंघस्तरीय महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तुळजापूर येथील वंश मंगल कार्यालयात पार पडलेल्या या शिबिरात विविध शासकीय विभागांनी एकाच छताखाली सेवा उपलब्ध करून दिल्याने हजारो नागरिकांनी लाभ घेतला.

या शिबिराचे उद्घाटन आमदार रणजागजितसिंह पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पंचायत समिती सभापती विक्रमसिंह देशमुख, माजी सभापती बसवराज धरणे, अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त आणि स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विशेष शिबिरात सुमारे १,४०० नागरिकांनी भेट देत विविध शासकीय योजनांची माहिती घेतली. त्यापैकी १,०५० नागरिकांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आला, तर ७४९ नागरिकांचे विविध योजनांसाठी अर्ज स्वीकारण्यात आले.

या शिबिरात नगर परिषद तुळजापूर व नळदुर्ग, महसूल विभाग, आरोग्य विभाग, सामाजिक न्याय विभाग, महिला व बाल विकास विभाग, वन विभाग, कृषी विभाग, आरटीओ, पोलीस विभाग, कौशल्य विकास विभाग, पंचायत समिती, पोस्ट कार्यालय, तहसील कार्यालय तसेच इतर अनेक शासकीय विभागांनी सहभाग घेत नागरिकांना विविध योजनांचा लाभ उपलब्ध करून दिला. घरकुल योजना, आयुष्मान भारत, महात्मा फुले जनआरोग्य योजना, पीक किसान योजना, कृषी यंत्रीकरण, दिव्यांग लाभ, महिला व बाल विकास योजना, वन विभागाच्या योजना, शिधापत्रिका वितरण, डिजिटल ७/१२, फार्मर आयडी, विविध दाखले, सायबर जनजागृती, वाहतूक नियमांचे मार्गदर्शन यासह अनेक सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार अरविंद बोळणे, अपर तहसीलदार फुरसोतम कोकरे, अपर तहसीलदार प्रमोद गायकवाड, निवासी नायब तहसीलदार प्रियांका लोखंडे तसेच विविध विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

शासनाच्या विविध विभागांनी समन्वयाने काम करत नागरिकांच्या दारी शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्याचा हा उपक्रम यशस्वी ठरल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. एकाच ठिकाणी विविध सेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत शासनाच्या या उपक्रमाचे स्वागत केले.

 
Top