तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर, अणदूर आणि नळदुर्ग या प्रमुख शहरांची जलवाहिनी मानल्या जाणाऱ्या नळदुर्ग येथील बोरी (कुरनूर) मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने घटला असून सध्या केवळ 13 टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. आगामी काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास परिसरास तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.
कुरनूर मध्यम प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता 32.26 दलघमी आहे. सन 2025 मध्ये धरण शंभर टक्के भरले होते. मात्र यंदा अपुऱ्या पावसामुळे धरणातील उपयुक्त पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. प्रकल्पातील मृत पाणीसाठा 2.98 दलघमी असून सध्या केवळ 4.07 दलघमी पाणी उपलब्ध आहे. या प्रकल्पातून साधारण 16 दलघमी पाणी सिंचनासाठी वापरले जाते. तुळजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या प्रकल्पातील स्थितीची पाहणी करण्यासाठी नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा सभापती सागर कदम, नगरसेवक मधुकर शेळके, पाणीपुरवठा प्रमुख महादेव शिंदे तसेच संबंधित कर्मचाऱ्यांनी धरण परिसराला भेट दिली. यावेळी उपलब्ध पाणीसाठा आणि भविष्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
पाणीसाठ्यातील घट लक्षात घेता तुळजापूर शहरातील पाणीपुरवठा एक दिवसाआड करण्याऐवजी दोन दिवसाआड करण्याचा प्रस्ताव नगराध्यक्षांसमोर मांडण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा सभापती सागर कदम यांनी दिली. शहरातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना, पाणी कपात आणि पुढील नियोजनाबाबत निर्णय घेण्यासाठी 29 जून रोजी सकाळी 11 वाजता नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
