धाराशिव (प्रतिनिधी)- पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच परी. पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांच्या नेतृत्वाखाली कळंब पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येवून 59 लाख 23 लाख 128 रूपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे.
या मोहिमेदरम्यान परी. पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथकाने दोन पंचांच्या उपस्थितीत डिकसव (ता. कळंब) येथील प्रभाकर भैरुबा चौधरी यांच्या घरातील एका खोलीवर छापा टाकला. सदर ठिकाणी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला व मानवी आरोग्यास अपायकारक ठरणारा गुटखा तसेच विविध तंबाखूजन्य पदार्थांचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला.
याबाबत घरमालक प्रभाकर चौधरी यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी सदर खोली मागील एक महिन्यापासून गणेश भिकाजी घेवारे (रा. डीकसव, ता. कळंब) यांना भाडेतत्त्वावर दिल्याचे सांगितले. पुढील चौकशीत जप्त करण्यात आलेला प्रतिबंधित साठा हा गणेश घेवारे यांचाच असल्याचे निष्पन्न झाले.
छाप्यामध्ये सम्राट पान साला 3240 पुडे, गोवा 1000 गुटखा 9040 पुडे, तारा सुगंधित पान मसाला 1248 आदी विविध कंपन्यांचा गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण 59 लाख 23 हजार 128 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.जप्त करण्यात आलेला सर्व मुद्देमाल पोलीस ठाणे कळंब येथे जमा करण्यात आला असून, अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये पुढील कायदेशीर कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन, धाराशिव यांच्याकडे आवश्यक अहवाल सादर करण्यात आला आहे.
परी. पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या यशस्वी कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी, सुरेश कासुळे, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र बहुरे, सिराज पठाण तसेच पथकातील अधिकारी-कर्मचारी आणि कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार यांनी मोलाची भूमिका बजावली.