कळंब (प्रतिनिधी)- कळंब शहरात अवैध गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री करणाऱ्यांविरोधात कळंब पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. पापड गल्ली परिसरातील एका गोदामावर अचानक छापा टाकून पोलिसांनी तब्बल 5 लाख 69 हजार 800 रुपयांचा गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध तंबाखू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
ही कारवाई सोमवार, दि. 22 जून 2026 रोजी दुपारी सुमारे 2 वाजता करण्यात आली. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, पापड गल्ली येथील सोमनाथ क्षीरसागर यांच्या मालकीच्या गोदामात अवैध गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा करून पोलिस निरीक्षक शकील शेख यांनी पथकासह गोदामावर अचानक धाड टाकली. छाप्यात विविध प्रकारचा गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून हा सर्व मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शकील शेख, सहाय्यक पोलिस निरीक्षक राम घाडगे, पोलिस नाईक भाऊसाहेब पोळ, अजीज शेख, इरफान शेख, पोलिस अंमलदार परमेश्वर कदम, अनिल भोसले, असराम खाडे, गोविंद मोटेगावकर तसेच महिला पोलिस अंमलदार क्षीरसागर यांच्या पथकाने केली. शहरात तरुणाईच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या गुटखा माफियांवर अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा कळंब पोलिसांनी दिला आहे.
