धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद शिक्षण विभागातील व्यवस्थापनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जाणारी केंद्र प्रमुखांची पदे गेल्या 12 वर्षापासून रिक्त होती. त्यामुळे अनेक ठिकाणी शिक्षकांनाच अतिरिक्त पदभार देवून कामकाज चालवावे लागत होते. मात्र आता नियमित केंद्र प्रमुखांची प्रतिक्षा संपुष्टात आली असून, समुपदेशानाद्वारे दि. 19 जून रोजी 40 जणांना केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती देण्यात आली.

शिक्षण विभागामध्ये केंद्रप्रमुख पद व्यवस्थानाच्या दृष्टीने अंत्यत आवश्यक मानले जाते. जिल्ह्यात एकूण 80 केंद्रप्रमुखांची पदे मंजूर आहेत. मात्र यापैकी नियमित केंद्रप्रमुख म्हणून केवळ 14 जण कार्यरत होते. गेल्या बारा वर्षात बदली, विस्तार अधिकारीपदी बढती व सेवानिवृत्तीमुळे ही पदे सातत्याने रिक्त होत गेली. सध्या तब्बल 66 पदे रिक्त झाली होती. नियमानुसार यातील 40 पदावर परीक्षा घेवून शिक्षकांचा बढती देण्याची प्रक्रिया करण्यात आली. यासाठी समुहसाधन केंद्र समन्वयक तथा केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षा घेतली होती. यामधून नंतर प्रक्रिया करून 40 जणांची अंतिम निवड करण्यात आली. त्यांना पदस्थापना देण्यासाठी प्रक्रिया शुक्रवारी पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदळकर, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम भालके, शिक्षणाधिकारी डॉ. रविंद्र खंदारे, उपशिक्षणाधिकारी कैलास पिकवणे तसेच विस्ताराधिकारी जंगम यांच्या उपस्थितीत समुपदेशन प्रक्रिया पार पडली. 


 
Top