धाराशिव (प्रतिनिधी)- मागील 20 वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षकांची पदे भरलेली नाहीत. परिणामी अनेक बी.पी.एड. व एम.पी.एड. पदवीधर उमेदवार बेरोजगार आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक शिक्षणाची आवश्यकता असून, सीबीएसई, इंग्रजी तसेच मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळांमध्येही अनेक ठिकाणी ही पदे रिक्त असल्याने महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाने पदभरती करण्याची मागणी केली आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरणातील प्रकरण क्रमांक 7 मध्ये जिल्हा परिषद केंद्र शाळांवर शारीरिक शिक्षण शिक्षक (क्रीडा) नियुक्त करण्याच्या स्पष्ट सूचना आहेत. तसेच दि. 15 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार केंद्र शाळांमध्ये क्रीडा शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे. मात्र अद्यापही ही पदे रिक्त असल्याने संबंधित विभागाने तातडीने भरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करण्यात आली. जिल्हा परिषद केंद्र स्तरावरील शारीरिक शिक्षण शिक्षक (क्रीडा) पदांची संपूर्ण रिक्त पदे पवित्र पोर्टलद्वारे भरण्यात यावीत. दि. 02 जानेवारी 2026 च्या शासन निर्णयानुसार सदर पदे पवित्र पोर्टलच्या पहिल्या टप्प्यात 100 टक्के भरावीत. दि.15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार माध्यमिक स्तरावरील शारीरिक शिक्षण विषयाची मंजूर व रिक्त पदे पवित्र पोर्टलवर दाखवून पूर्ण क्षमतेने भरावीत. पवित्र पोर्टल टेस्ट 2025 भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी.
हे निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदळकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांना देण्यात आले. निवेदनावर अजिंक्य वराळे, योगेश थोरबोले, रोहित सुरवसे, किरण जाधव, योगेश ताटे, बळीराम कांबळे, आशुतोष माने, दिनेश माने, अविनाश थोरबोले, योगिनी साळुंखे, ऋषिकेश पाटील आणि स्वाती शिरसट यांच्या स्वाक्षरी आहेत.
