धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने दोन संतापजनक घटनांवर ठोस कारवाईची मागणी करत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. बेबी पाटील आत्मदहन प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा तसेच नसरापूर (ता. भोर) येथील चिमुरडीवरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपीला फास्ट ट्रॅक न्यायालयातून त्वरित फाशीची शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी बेबी पाटील यांनी आपल्या अन्यायाविरोधात प्रशासनाला पत्राद्वारे पूर्वसूचना दिली होती. मात्र, प्रशासनाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. आनंदनगर पोलीस ठाण्याकडून कोणतेही समुपदेशन करण्यात आले नाही. तसेच दुय्यम निबंधक व संबंधित अधिकाऱ्यांनीही मागणीचा विचार केला नाही. परिणामी, त्यांनी आत्मदहनाचा टोकाचा निर्णय घेतला असून त्या सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून करण्यात आली. तसेच भोर तालुक्यातील नरसापूर येथे चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करत, हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून शिक्षा फाशी देण्यात यावी, अशी मागणीही राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान, या मागण्यांची तात्काळ दखल न घेतल्यास 20 मे रोजी राष्ट्रीय महामार्गावर किंवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देण्यापूर्वी महिलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून पायी मोर्चा काढला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या निवेदनावर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मनीषा पाटील, शहराध्यक्षा सरोजा जाधव, मंजुषा खळदकर, भक्ती राखुंडे, संगिता सलगर, मनीषा काशीद, आशा राखुंडे, श्यामल जाधव, अमृता जाधव, साधना शिंगाडे, सरस्वती कदम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.