तुळजापूर (प्रतिनिधी)- आई तुळजाभवानीच्या चरणी भक्ती आणि आधुनिक सुविधांचा संगम घडवण्यासाठी महायुती सरकारकडून मोठी पावले उचलली जात आहेत. तुळजाभवानी मंदिर हे शक्तीपीठ जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन केंद्र बनवण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा आता प्रत्यक्षात येत आहे. पुढील महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत या विकासकामांचा भव्य शुभारंभ होणार आहे.
या पार्श्वभूमीवर धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मंदिराच्या जतन, संवर्धन आणि विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सुरू असलेल्या कामांना गती देत उर्वरित प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. महायुती सरकारने या प्रकल्पासाठी तब्बल 2,000 कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर केला असून, यामुळे तुळजापूरचा चेहरामोहरा पूर्णतः बदलणार आहे. तसेच तुळजापूरला रेल्वेने जोडण्यासाठीही प्रयत्न वेगाने सुरू असून, लवकरच भाविकांना मोठी सुविधा मिळणार आहे. श्रद्धा आणि आधुनिक सुविधांची सांगड घालत तुळजापूरचा सर्वांगीण विकास करण्याचा सरकारचा निर्धार असून, आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने हा प्रकल्प लवकर पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
