धाराशिव (प्रतिनिधी)- या अर्थसंकल्पात नेहमीप्रमाणे थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना जाचक अटी व शर्ती लावून संपूर्ण कर्जमाफी ऐवजी दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या रिकाम्या ताटात विकासाची जाहिरात लावण्याचा निर्लज्ज खटाटोप करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हातात स्वप्नांचा भोपळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यामुळे शेतकऱ्यांची घोर निराशा झाली असल्याचे टीका समाजवादी नेते ॲड रेवण भोसले यांनी केली आहे.
तसेच या अर्थसंकल्पात शब्दांचा बाजार व आकड्यांची फेकाफेकी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे कर्जापाई शेतकऱ्यांना किडण्या विकाव्या लागत आहेत. महापालिका,नगरपरिषद तसेच जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता सरळ केराची टोपली या अर्थसंकल्पात दाखविली आहे. मराठवाड्यात 2025 मध्ये 2100 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत .या अर्थसंकल्पात शेतकरी ,कष्टकरी कामगार, महिला व बेरोजगार तरुणांसाठी कसलीही भरीव तरतूद नाही. 2014 पासून शेतकरी सन्मानाच्या नावावर आर्थिक आमिष दाखविल्यामुळे निराशेच्या गरतेत ढकलला गेलेला शेतकरी विषयाचा प्याला जवळ करत आहे. महायुती सरकारच्या भ्रष्ट व निष्क्रिय कारभारामुळे राज्याची आर्थिक स्थिती पूर्णपणे डबघाईला आलेली असून या अर्थसंकल्पामध्ये फक्त बनवाबनवी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता, कष्टकरी कामगार, शेतकरी, शेतमजूर, महिला व बेरोजगार तरुणांच्या हातात तुरी दिल्या असल्यामुळे या अर्थसंकल्पाने सर्वांची घोर निराशा केली असल्याचीही टीका ॲड. भोसले यांनी केली आहे.
