धाराशिव (प्रतिनिधी)-  नळदुर्ग-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्या तिघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने कडक शिक्षा सुनावली आहे. तब्बल 97.96 किलो गांजा वाहतूक प्रकरणी आरोपींना प्रत्येकी 12 वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 1 लाख 50 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र.1 श्रीमती टी. जी. मिटकरी यांनी गुरुवारी (दि.5 मार्च) हा निकाल दिला. 

या प्रकरणातील आरोपींमध्ये बाळासाहेब दशरथ परबत (रा. तडवळे (म) ता. माढा जि. सोलापूर), सोमनाथ दत्तात्रय कदम (रा. कदम वस्ती, कान्हेरी ता. मोहोळ जि. सोलापूर) आणि मिना उर्फ मिनाताई दिलीप पाटील (रा. सारोळा ता. परंडा जि. धाराशिव) यांचा समावेश आहे. दिनांक 17 जून 2020 रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात अधिकारी उपस्थित असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एमएच 25 एएल 9199 क्रमांकाच्या इनोव्हा क्रिस्टा कारमधून गांजा या अंमली पदार्थाची अवैध वाहतूक होणार आहे. या माहितीची दखल घेत पोलिसांनी तात्काळ वरिष्ठांना कळवले. त्यानुसार पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी तुळजापूर यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पोलिसांनी पंच, महसूल अधिकारी व आवश्यक साहित्य घेऊन सापळा रचला. रेड कारवाईसाठी नायब तहसिलदार अमित रमेश भारती यांना सक्षम अधिकारी म्हणून उपस्थित ठेवण्यात आले. पंचांच्या उपस्थितीत पोलीस पथकाने नळदुर्गसोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अणदूर गावाजवळील देशमुख वस्तीजवळ पहाटे सापळा लावला. दिनांक 18 जून 2020 रोजी पहाटे सुमारे 2.45 वाजता संशयित वाहन तेथून जात असताना पोलिसांनी त्याला थांबवले. कारमध्ये दोन जण आढळून आले. त्यांनी आपली नावे बाळासाहेब दशरथ परबत आणि सोमनाथ दत्तात्रय कदम अशी सांगितली. पंचांसमक्ष वाहनाची झडती घेतली असता कारच्या सीटजवळ पाच प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये गांजा असल्याचे आढळून आले.

घटनास्थळी अंधार व वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता असल्याने आरोपींना वाहनासह नळदुर्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे पंच व महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोत्यांचे वजन करण्यात आले. त्यामध्ये एकूण 97 किलो 960 ग्रॅम गांजा असल्याचे निष्पन्न झाले. या गांजाचे बाजारमूल्य सुमारे 19 लाख 59 हजार 200 रुपये इतके होते. गांजाचे नमुने पंचांसमक्ष सीलबंद करून प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठवण्यात आले. तसेच गांजाच्या वाहतुकीसाठी वापरलेली इनोव्हा क्रिस्टा कार (अंदाजे किंमत 15 लाख रुपये) देखील जप्त करण्यात आली. आरोपींकडून काही कागदपत्रे व मोबाईलही जप्त करण्यात आले.

तपासादरम्यान मोबाईल कॉल डिटेल्स (सीडीआर) व टॉवर लोकेशनच्या आधारे मिना उर्फ मिनाताई दिलीप पाटील हिचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेली इनोव्हा कार तिच्या नावावर असल्याचे आढळून आले. त्यामुळे तिला अटक करून तिच्या विरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्यात अभियोग पक्षाच्या वतीने 15 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली, तर बचाव पक्षाकडून 2 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. न्यायालयाने सर्व पुरावे, पंचनामा, तपास अहवाल तसेच दोन्ही बाजूंचे युक्तिवाद विचारात घेतले. सदर प्रकरणात आरोपी बाळासाहेब परबत, सोमनाथ कदम आणि मिना उर्फ मिनाताई पाटील यांना एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क), 20(क) व 29 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले. त्यानुसार न्यायालयाने प्रत्येकी 12 वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 1 लाख 50 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक एस. पी. चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक जगदीश नवनाथ राऊत तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांनी केला. सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा शासकीय अभियोक्ता एम. बी. देशमुख यांनी प्रभावी युक्तिवाद केला. 


 
Top